कोल्हापूर विधान परिषद : किती घेशील दो कराने

कोल्हापूर  विधान परिषद : किती घेशील दो कराने
Published on
Updated on

कोल्हापूर : संतोष पाटील

एरवी ज्यांच्या भेटीसाठी ताटकळत बसावे लागत होते, तेच नेते आणि त्यांचे शिलेदार आता उमेदवार आणि संबंधितांच्या घरात येऊन दस्तक देऊ लागले आहेत. मदतीची उजळणी करण्यासह काय नको, काय पाहिजे याची आस्थेवाईक चौकशी करत आहेत. कळत-नकळत डावलले गेले असल्यास हात जोडून माफी मागितली जात आहे. 'डिमांड' वाढल्याने 'अनंत हस्ते कमलावराने देता, किती घेशील दो कराने' अशीच काहीशी अवस्था विधान परिषदेच्या मतदारांसह त्यांच्या 'गॉड फादर' यांची झाली आहे.

या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी आमदार अमल महाडिक हे पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी आमने-सामने आल्याने लढत रंगतदारच होणार आहे. पालकमंत्री पाटील यांनी महिन्यापूर्वीच प्रचारात आघाडी घेतली आहे. तर उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी महाडिक कुटुंबातील सदस्यांनी प्रचारास सुरुवात करत पालकमंत्री पाटील यांच्या विरोधात आघाडी उघडली होती. आता लढतीचे चित्र स्पष्ट झाल्याने साचेबद्ध प्रचाराला वेग आला आहे. भल्या पहाटेच नेत्यांच्या गाड्या मतदार आणि आघाडी प्रमुखांच्या घराकडे निघत आहेत. प्रतिस्पर्ध्यांवर लक्ष ठेवून भेटीगाठीचा पाठशिवणीचा खेळ रंगला आहे.

राजकीय ईर्ष्येच्या गंगेत हात धुऊन घेण्याची घाई अनेकांना लागली आहे. बहुतांश मतदारांना 'टोकन' पोहोचले आहे. काहीजण भाव वधारणार असल्याने तटस्थ राहून किंमत वाढण्याची प्रतीक्षा करत आहेत. भविष्यातील राजकारण काहीही होऊ दे, आता दारात आलेल्या लक्ष्मीला परत पाठवायची नाही, अशी अनेकांची मानसिकता असल्याचे प्रचारात असलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद सदस्यांपासून नगरसेवकांपर्यंत गठ्ठा मतदान ताब्यात असलेल्या नेत्यांचा राजकीय 'भाव' या सत्तेच्या साठमारीत चांगलाच वधारला आहे. कुणाला निधी हवा आहे, कोणाला राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे, कोणाला भविष्यातील राजकीय जोडणी साधायची आहे, काहींना आताच मताचे मोल पदारत पाडून घ्यायचे आहे. उमेदवार आणि त्यांचे पाठीराखेही मतदारांची इच्छापूर्ती करण्यात कसूर राहू नये, याची काळजी घेत आहेत.

मोठा लवाजमा व्यस्त

जिल्ह्यात फक्त 417 मतदार असले तरी कार्यकर्त्यांची मोठी फौज दोन्ही बाजूंनी मैदानात उतरली आहे. थिंक टँक आकडेमोड करण्यात मग्न आहे. नेत्यांचा उद्याचा दौरा रात्रीच निश्चित करून प्रतिस्पर्धींच्या भेटीगाठीनुसार त्यात बदल केला जात आहे. नेत्यांच्या मागेपुढे करणारी यंत्रणा म्हणजे पालखीचे भोई, तालुक्यासह विभागवार अंदाज काढून जोडण्या घालण्यात मग्न असणारे भालदार-चोपदार, सोशल मीडियावर प्रचारात मग्न असणारी कार्यकर्त्यांची फौज म्हणजे वाजंत्री, निकालाचे काय होणार याची व्यर्थ चिंता वाहणारे बघे अर्थात निवडणुकीशी काहीही संबंध नसलेले सर्वसामान्य, असा मोठा लवाजमा निवडणुकीत व्यस्त असल्याचे चित्र आहे.

पाहा व्हिडिओ

सांगलीतील आयर्विन पूल झाला ९२ वर्षाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news