मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा राधानगरी, भुदरगड, कागल, करवीर या चार तालुक्यातील 218 गावांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत आज (रविवार) सकाळी आठ वाजता मतदान नोंदवण्यास प्रारंभ झाला. काही ठिकाणी सकाळीच मतदानास उत्साही वातावरण दिसून आले. बिद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील यांनी आपल्या मुदाळ गावी मतदानाचा हक्क बजावला. सत्तारूढ व विरोधी आघाडीचे कार्यकर्ते अगदी सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदान आणण्यासाठी सक्रिय झाल्याचे दिसून आले.
मतदान केल्यानंतर के. पी. पाटील यांनी आपण अध्यक्षपदाच्या कालावधीत सर्व संचालक मंडळाला विश्वासात घेऊन काम केले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्याला राज्यात कायमच एक नंबरचा दर दिला आहे. केलेल्या कामाची पोचपावती म्हणून साखर कारखान्याला अनेक राज्य, राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. माझा ठाम विश्वास आहे की, या निवडणुकीत पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, माजी आमदार दिनकरराव जाधव, माजी आमदार बजरंग देसाई, माजी आमदार संजय घाटगे, गोकुळचे अध्यक्ष अरूण कुमार डोंगळे, कोल्हापूर ग्रामीण भाजपचे अध्यक्ष राहुल देसाई यांच्या नेतृत्वाखालील श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील.
येथून पुढे सुद्धा शेतकरी व कारखाना हा केंद्रबिंदू मानून ऊस उत्पादक शेतकऱ्याला जास्त दर देऊन त्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या संचालक मंडळाचा कारभार असेल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबरच बिद्री साखर कारखान्यामध्ये जो कर्मचारी वर्ग आहे त्यांचेही हित साधण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे असे ते म्हणाले.
हेही वाचा :