Kolhapur Rain : अवकाळी पावसाची धामणी खोऱ्यास भीती | पुढारी

Kolhapur Rain : अवकाळी पावसाची धामणी खोऱ्यास भीती

म्हासुर्ली: पुढारी वृत्तसेवा : अवकाळी पावसाने राज्यातील काही भागात हजेरी लावत दाणादाण उडविली आहे. उर्वरित महाराष्ट्रालाही पावसाचे अलर्ट मिळत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आणि दिवसभर निर्माण होणाऱ्या ढगाळ वातावरणाने धामणी खोऱ्यातील शेतकर्‍यांना धास्ती लागून राहिली आहे. सध्या शेतकर्‍यांनी मातीबंधारे बांधून नदीत पूर्ण क्षमतेने पाणीसाठा केला आहे. नदीतील अतिरिक्त पाण्याचा बंधार्‍यावरील तयार केलेल्या छोट्या -छोट्या आऊट लेटमधून विसर्ग होत आहे. त्यातच पाऊस पडल्यास पाण्याचा अधिक दाब  बंधाऱ्‍यांवर पडणार असून तो दाब न पेलणारा ठरणार आहे. त्यामुळे बंधारा फुटीचा प्रसंग नाकारता येत नाही. पाण्याच्या अतिरिक्त दाबाने यापूर्वीही बंधारे फुटीच्या घटना घडून शेतकर्‍यांना मोठ्या हाणीला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे शेतकरी वर्गात सध्या काहीसे चिंतेचे वातावरण आहे. ( Kolhapur Rain )

संबंधित बातम्या 

उन्हाळ्यातील अधिक काळ निर्माण होणाऱ्या पाणीटंचाई काळात अवकाळी पावसाची येथील शेतकर्‍यांना आस लागून राहिलेली असते. दरम्यान एक – दोनदा जरी पाऊस बरसला तरी होरपळणाऱ्या शेतीला संजीवनी मिळून शेतकरी वर्गाला उभारी मिळत असते. पण मागील दोन वर्षात परिसरात उन्हाळ्यात अवकाळीची हुलकावणी मिळत शेतकरी वर्गात निराशा पसरली होती. यंदा खरीप पिके पोसण्याच्या काळात पावसाने दडी मारली होती. पण ऐन पिके काढणीच्या काळातच पावसाने हजेरी लावत धान्याचे मोठे नुकसान केले होते. त्यातून सावरत येथील शेतकरी उन्हाळी पिकांसाठी पाण्याची तजवीज करण्यासाठी सरसावला होता. सध्या नदीत मातीबंधार्‍यांत पूर्ण पाणीसाठा करून काही काळासाठी शेतकरी निश्चित झाला असला तरी सध्या या बंधाऱ्यांवर संभाव्य पावसाच्या चिंतेचे काहीसे ढग दाटलेले आहेत.

पुढील दोन दिवसात जिल्ह्यात पाऊस पडल्यास याचा अधिक फटका धामणी खोऱ्यास बसणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखोंचा खर्च करत शेतकऱ्यांनी नदीवर आठ -नऊ ठिकाणी मातीबंधारे बांधलेले आहेत. नदी अगदी कमी पाण्याने प्रवाहित असते, त्याकाळात हे बंधारे बांधले गेल्याने ते सुरक्षित आहेत. थोड्या प्रमाणात अतिरिक्त पाणी वाहत असले तरी त्या पाण्याचा विसर्ग होण्यासाठी छोटे आऊटलेट बनविले आहेत. मात्र, प्रमाणापेक्षा पाण्याच्या प्रवाहात थोडीही वाढ झाली तरी तसा विसर्ग होण्यासाठी कोणतीच यंत्रणा नसल्याने ही बंघाऱ्यांसाठी धोक्याची घंटा असते. यापूर्वीही अतिरिक्त पाण्याने डळमळीत होवून बंधारे फुटीचे प्रकार घडले आहेत. यात लाखोंची वित्तहानी झालेली आहे. शिवाय पाणी वाहून गेल्याने लोकांवर पाणी- पाणी करण्याची वेळ येवून गेलेली आहे. खरी गरज असताना पावसाने पाठ फिरवली. पण सध्या तितकिशी गरज नसतानाही पाऊस पडल्यास तो परिसरातील नुकसानीस कारणीभूत ठरणार आहे.

बंधारा फुटीस परिणाम कारक गोष्टी

१) यापूर्वी परिसरात वारंवार विजेचा लपंडाव चालत असे. परिणामी विद्युत पंप बंद राहिल्याने उपशा अभावी बंधाऱ्यांतील पाणीसाठ्यात झपाट्याने होणारी वाढ बंधारे डळमळीत होण्यास कारणीभूत ठरत असे.

२) डिसेंबर – जानेवारी दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्यास पिकांना पाण्याची गरज कमी पडते. परिणामी, उपसाही त्या प्रमाणात कमी राहतो. शिवाय मोठा पाऊस झाल्यास पाणी उपसा बंद होतो. शिवाय नदी प्रवाहित होवून बंधारे डळमळीत होतात. हे डळमळीत झालेले बंधारे कोणत्याही क्षणी फुटून जाण्याची शक्यता असते. ( Kolhapur Rain )

Back to top button