एक्स्प्रेस-वेवर : लढाऊ विमानातून मोदींसमोर भररस्त्यावर उतरले कमांडोज | पुढारी

एक्स्प्रेस-वेवर : लढाऊ विमानातून मोदींसमोर भररस्त्यावर उतरले कमांडोज

सुलतानपूर ; वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्स्प्रेस-वेवर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमक्ष हवाई दलाने इतिहास रचला. एक्स्प्रेस-वेवर तयार करण्यात आलेल्या आपत्कालीन हवाईपट्टीवर ‘मिराज-2000 मल्टिरोल फायटर’ विमानाने लँडिंग केले. येथेच ‘मिराज’मध्ये इंधनही भरण्यात आले. नंतर हवाई दलाचे वाहतूक विमान एएन-32 महामार्गावर उतरले. विमानातून कमांडोज बाहेर आले आणि त्यांनी मोहीम फत्ते केल्याचे थरारक प्रात्यक्षिकही सादर केले.

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाकडे चीनशी दोन हात करण्यासाठीची भारताची तयारी म्हणून पाहिले जात आहे. ‘सुखोई’, ‘मिराज’, ‘राफेल’, ‘एएन 32’, ‘सूर्यकिरण’ यासारखी लढाऊ विमाने या ‘एअर शो’मध्ये सहभागी झाली. फ्रान्सकडून खरेदी केलेले ‘राफेल’ विमान पहिल्यांदाच रस्त्यावर उतरणार होते म्हणून दुतर्फा प्रेक्षकांचीही मोठी गर्दी होती. आजच्या या यशस्वी प्रात्यक्षिकाने एक्स्प्रेस-वेवर 3-3 एअर स्ट्रिप साकारणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य बनले आहे. याआधी आग्रा एक्स्प्रेस-वेवर ‘मिराज 2000’, ‘जग्वार’, ‘सुखोई-30’ आणि ‘सुपर हर्क्युलिस’सारखी विमाने हवाई दलाने यशस्वीरीत्या उतरविलेली आहेत.

मंगळवारच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्वांचल एक्स्प्रेस-वेचे लोकार्पण केले. ‘हर्क्युलिस’ विमानाने एक्स्प्रेस-वेवर उतरणारे ते पहिले पंतप्रधान ठरले आहेत. उत्तर प्रदेशातील रन-वे (हवाईपट्टी) असलेला पूर्वांचल हा तिसरा एक्स्प्रेस-वे आहे. इथून लढाऊ विमाने उड्डाणही घेऊ शकतील आणि येथे उतरूही शकतील. आग्रा एक्स्प्रेस-वे आणि यमुना एक्स्प्रेस-वे या उत्तर प्रदेशातील दोन महामार्गांवर याआधी लढाऊ विमाने उतरलेली आहेत.

Back to top button