

कासारवाडी : पुढारी वृत्तसेवा : ऊस दर आंदोलनासाठी गुरुवारी (दि.२३) रोजी अकरा वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शिरोली पुलाची येथे महामार्ग रोखणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी आज शिरोली पुलाजवळ चक्का जाम आंदोलन केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी उपस्थित होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानीच्या काही कार्यकर्त्यांना बुधवार रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले होते. (Sugar Cane Farmers Agitation Kolhapur)
संबंधित बातम्या
आंदोलकांनी हातात बॅनर आणि ऊस घेऊन पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक कोल्हापूर शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्याजवळ रोखून धरण्याचा प्रयत्न केला. अधिक मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळूर महामार्ग अथवा राष्ट्रीय महामार्ग ४ वरील वाहतूक हातकणंगले, पन्हाळा आणि इतर मार्गाने वळवली जात आहे. तसेच या मार्गावर रांगा लावल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
दरम्यान, महामार्गावरील वाठार, टोप, शिये फाटा येथे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता. तर सांगली- कोल्हापूर रस्त्यावर रूकडी फाटा, हेरले फाटा येथेही बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रूकडी, माणगाव या परिसरातील कार्यकर्ते रूकडी पुलावरून गांधीनगरमार्गे आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. काही आंदोलक स्वतः जेवण डब्यात घेऊन आले होते. (Sugar Cane Farmers Agitation Kolhapur)
काही ठिकाणी पोलीस येणाऱ्या दुचाकी व चार चाकीची तपासणी करत होते. याची माहिती आपल्या इतर कार्यकर्त्यांना सोशल मीडियावरून देत होते. यामुळे कार्यकर्त्यांनी इतर मार्गाचा वापर करत आंदोलनस्थळी एकटवले. सकाळी अकरा वाजल्यानंतर आंदोलकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली.