नाशिक : क्रिप्टोकरन्सीच्या नादात गमावले ४३ लाख, तरुणाची फसवणूक | पुढारी

नाशिक : क्रिप्टोकरन्सीच्या नादात गमावले ४३ लाख, तरुणाची फसवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जेलरोड परिसरातील एका तरुणास व्हॉटसॲपवर क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगची लिंक पाठवून भामट्याने युवकास ४३ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. मिलींद तिर्थराज पाटील (३२, रा. जेलरोड) याने याबाबत सायबर पोलिस ठाण्यात फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फिर्याद दाखल केली.

मिलिंद पाटील यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान, भामट्याने लिंक पाठवून क्रिप्टो करन्सीबाबत माहिती दिली. क्रिप्टो करन्सीत आर्थिक गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल, असे आमीष दाखवून भामट्याने मिलींद यांना गुंतवणूकीस प्रोत्साहित केले. त्यानुसार मिलींद यांनी ४३ लाख २२ हजार ९५० रुपयांची गुंतवणूक केली. मात्र भामट्याने मिलींद यांना कोणताही परतावा दिला नाही किंवा पैसेही परत केले नाहीत. त्यांनी भामट्याकडे पैशांची मागणी केली असता त्याने टाळाटाळ केली. त्यामुळे मिलींद यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली. संपर्क साधणाऱ्या भामट्यासह खात्यात पैसे वर्ग झालेल्या बॅक खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख याप्रकरणी तपास करीत आहेत.

Back to top button