Chandgad Drugs Case : ढोलगरवाडीतील अमली पदार्थ प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात | पुढारी

Chandgad Drugs Case : ढोलगरवाडीतील अमली पदार्थ प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात

चंदगड; पुढारी वृत्तसेवा : Chandgad Drugs Case : अमली पदार्थ तस्करी प्रकरणी मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाचा तपास आज (दि. १६) दुसऱ्या दिवशीही अपुरा राहिला. तपास अंतिम टप्प्यात आला असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकासह गृह विभागाचे वरीष्ठ अधिकारी आणि प्रयोगशाळा तज्ज्ञांची टीम आज ढोलगरवाडीत दाखल झाली. तीन दिवसानंतरही तपास पूर्ण झाला नसल्याने यामध्ये मोठे रॅकेट गुंतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडीत गुन्हे अन्वेषण शाखेचे अमली पदार्थ विरोधी पथक दाखल झाले आहे. मात्र याबाबत पोलिसांनी आज दुसऱ्या दिवशीही मौन पाळले. तस्करीचा थेट संबंध ढोलगरवाडी गावांशी आल्याने पंचक्रोशीत आज सायंकाळी उलटसुलट चर्चा रंगली होती.

दैनिक ‘पुढारी’मध्ये बातमी झाल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. नेमके काय प्रकरण आहे याचा कानोसा लोक घेत होते. मात्र पोलिसांनी कमालीची गुप्तता राखली होती.

मुंबईत एका महिलेला ताब्यात घेतल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, ढोलगरवाडी येथील व सध्या मुंबईस्थित असलेल्या एकाच्या फार्म हाऊस व पोल्ट्री शेड्सची तपासणी केली. एमडी अंमली पदार्थ प्रकरण असल्याचे समजले. तपास अपूर्ण असल्याचे सांगून आज मंगळवारी (दि. १६) रोजी दुपारी या प्रकरणाची माहिती देणार असल्याचे सांगितले. रात्री उशिरापर्यंत तपासाची चक्रे फिरत होती.

चांगला माणूस जाळ्यात अडकला… !

मूळ गाव ढोलगरवाडी व मुंबईस्थित असलेला ‘चांगला’ माणूस अडकल्याची माहिती समोर येत आहे. त्याच्याकडे कामाला असणाऱ्यांची आज दिवसभर कसून चौकशी करण्यात आली. यामधून बरेच धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. पोल्ट्री शेड्स, फीड्स फॅक्टरी आणि फार्म हाऊसवर अहोरात्र पोलीस तपास यंत्रणा कार्यरत आहे.

Back to top button