राशिवडे: भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज (दि.१९) ८६.२६ टक्के मतदान झाले. राधानगरी तालुक्यातील तरसंबळे येथे २१८ पैकी २१८ म्हणजेच शंभर टक्के तर कोदवडे येथे ९७ टक्के इतके उच्चांकी मतदान झाले. रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये सोमवारी (दि.२०) सकाळी आठ आजता मतमोजणीस सुरूवात होणार आहे. मतमोजणी ३६ टेबलवर होणार असून यासाठी ३०० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सायंकाळी ६ पर्यत निकाल निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. (Bhogavati sugar factory election)
भोगावतीसाठी सतारुढ आमदार पी. एन. पाटील गटाबरोबर राष्ट्रवादीचे ए. वाय. पाटील, शेकापचे संपतराव पवार-पाटील, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, जनता दलाचे वसंतराव पाटील यांनी आघाडी केली होती. राजर्षी शाहू शेतकरी सेवा आघाडीच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरले होते. तर माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, हंबीरराव पाटील, जालंदर पाटील, अजित पाटील यांची भाजप, शिवसेना, काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानीची शिवशाहू परिवर्तन विकास आघाडीही रिंगणात होते. (Bhogavati sugar factory election)
तर माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील कौलवकर यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक कै. दादासाहेब पाटील कौलवकर यांची तिसरी आघाडी रिंगणात होती. दहा दिवसांच्या प्रचारमध्ये पाच दिवस दिपावली सणामध्ये गेले. त्यानंतर चार दिवसांमध्ये प्रचार यंत्रणा गावोगावी पोहोचली. आरोप प्रत्यारोपांचा धुरळा निघाला. सोशल मीडियावर तर आरोपांचा दर्जाच घसरला होता. आज दिवसभर इर्षेने मतदान झाले.
दु. २ पर्यत ६० ते ६५ टक्के मतदान झाले . कार्यकर्त्यांमध्ये मतदारांना आणण्यासाठी चढाओढ सुरु होती. सताधारी राजर्षी शाहू शेतकरी सेवा आघाडीचे नेते आमदार पी.एन.पाटील, शेकापचे संपतराव पवार यांनी सडोली मतदान केंद्रावर तर गोकुळचे अरूण डोंगळे यांनी घोटवडे येथे तर पी. डी. धुंदरे यांनी राशिवडे मतदान केंद्रावर तर वसंतराव पाटील यांनी कंथेवाडी येथे मतदान केले.
तर विरोधी शिवशाहू परिवर्तन विकास आघाडीचे नेते हंबीरराव पाटील यांनी हळदी येथे तर स्वाभिमानीचे जनार्दन पाटील यांनी परिते येथे तर सदाशिवराव चरापले, धैर्यशील पाटील यांनी कौलव येथे मतदान केले.
हेही वाचा