गुडाळ: भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज (दि.१९) सकाळी मतदानाला सुरूवात झाली. कार्यक्षेत्रातील गावागावातील मतदान केंद्र आणि उमेदवारांच्या बुथवर मतदारांची ने- आण करणे, मतदान क्रमांकाच्या स्लिप देणे, वयोवृद्ध मतदारांचे सहाय्यक म्हणून मतदान करणे, यासाठी सकाळपासून तरुणाई सक्रिय होती. मात्र, दुपारी दोनच्या सुमारास विश्वचषक क्रिकेटचा अंतिम सामना सुरू होण्यापूर्वीच मतदान केंद्र परिसर आणि उमेदवारांच्या बूथ वरून तरुणाई गायब झाल्याचे चित्र भोगावती कार्यक्षेत्रातील सर्वच गावांत दिसून आले.
भोगावती कारखान्याच्या निवडणुकीसाठी तिरंगी लढत होत आहे. मागील पंधरा दिवस प्रचाराच्या आघाडीवर सर्वच पक्षातील तरुणाई सक्रीय झाली होती. आज सकाळी मतदान सुरू झाल्यापासून तिन्ही आघाडीच्या मतदान यंत्रणेची सर्व सूत्रे या तरुणाईच्याच हाती होत्या. योगायोगाने आजच मतदान दिवशीच विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना होत आहे. भारतीय संघ अंतिम फेरीत खेळत असल्याने कार्यक्षेत्रातील क्रिकेट प्रेमी आणि सर्व तरुणाईचे लक्ष घड्याळात दुपारी दोन केव्हा वाजतात याकडे होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तरुणाई आणि क्रिकेट प्रेमींनी टीव्हीवर मॅच पाहायला जाण्यासाठी मतदान केंद्र परिसर आणि उमेदवारांच्या बूथ वरून काढता पाय घेतला असल्याचे चित्र दिसून आले.
अशा तऱ्हेने भोगावती कार्यक्षेत्रात ऐन मतदानादिवशीच तरुणाईचा निवडणूक ज्वर उतरला असल्याचे आणि क्रिकेट ज्वर वाढला असल्याचे दिसून आले आहे.
हेही वाचा