Maratha reservation : सुप्रीम कोर्टाच्या ‘त्या’ निकालपत्राचे गावोगावी पारायण करूया; सरूडमध्ये मराठा आरक्षण जागराचा पहिला कार्यक्रम | पुढारी

Maratha reservation : सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निकालपत्राचे गावोगावी पारायण करूया; सरूडमध्ये मराठा आरक्षण जागराचा पहिला कार्यक्रम

सरूड: पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला मोर्चे, उपोषण, आत्मक्लेश तसेच आडव्या तिडव्या भाषेत घोषणा देऊन आरक्षण मिळणार नाही. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या २०२१ च्या निकालपत्राचे गावोगावी जाऊन पारायण करूया. या निकालपत्रात आरक्षणाची व्याख्या, अडथळे आणि आरक्षणाचा साधासोपा मार्ग देखील दाखविला आहे, असे ठाम प्रतिपादन मराठा आरक्षणाचे अभ्यासक अॅड. बाबा इंदुलकर यांनी केले. (Maratha reservation)

१४४ मराठा आमदारांनी मागासवर्ग आयोगाने वेळोवेळी सभागृहाला दिलेले अहवाल नाकारण्याचे वेळीच धाडस दाखविले असते. तर मराठा आरक्षणाचा तिढा याआधीच सुटला असता. निदान यापुढे तरी मराठा समाजाने लोकप्रतिनिधींप्रति सजगता बाळगायला शिकावे. आरक्षण मिळणारच आहे. फक्त मराठ्यांनी एकोप्याने लढावे, असे कळकळीचे आवाहनही इंदुलकर यांनी यावेळी मराठ्यांना केले.
सरूड (ता. शाहूवाडी) येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित मराठा आरक्षण जागर या कार्यक्रमात ते बोलत होते. सरूडकर सकल समाजाच्या वतीने अतिथींचे स्वागत करण्यात आले. प्रा. डी. आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले. (Maratha reservation)

अॅड. इंदुलकर म्हणाले, मराठा आरक्षण देणाऱ्यांनीच मागच्या दाराने सुप्रीम कोर्टात जाऊन ते काढून घेतले. यासाठी कळसूत्री बाहुल्यांना नाचवत मराठा आरक्षणाचा लढा किचकट करण्याचे कटकारस्थान अद्यापही सुरू आहे. विशिष्ट राजकीय पक्ष आणि नेत्यांमुळेच मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा झाल्याचा आरोप करून या जुलुमी प्रवृत्तीच्या विनाशासाठीच जिगरबाज मनोज जरांगे-पाटील यांच्या रूपाने देवदूत उदयाला आला आहे. शाहू छत्रपती महाराजांची भक्कम साथ तसेच जरांगे यांचा त्याग, आंदोलनाने समाज जागा होऊ लागलाय, हे सुचिन्हच आहे. आरक्षण जागराचा जिल्ह्यातील पहिला कार्यक्रम घेणारे गाव म्हणून सरूडकरांचे कौतुकही केले.

महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाने (सन २००५) सेक्शन ११ अंतर्गत दर १० वर्षांनी ओबीसी आरक्षणाचे पुनर्रीक्षण करण्यास सांगितलेले असताना राज्यकर्त्यांनी मराठा द्वेषातून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. या पुनर्रीक्षणासाठी ग्रामपंचायत पासून मंत्रालयापर्यंत दबाव वाढविण्याची मोहीम हाती घेतली आहे. समाजातील युवक, युवतींनी या लढ्यात उतरावे असे आवाहनही जाताजाता अॅड. इंदुलकर यांनी केले.

यावेळी दत्ताजीराव देसाई, बाबा पार्टे यांनी विचार मांडताना परीक्षेच्या काळातच गडकोट मोहिमा काढण्यामागे मराठा समाजाला अशिक्षित ठेवण्याचा कुटील डाव असल्याचे सांगितले. मराठा विद्यार्थी परिषद स्थापून जागृती मोहीम आखण्याचा मनोदयही बोलून दाखवला. समन्वयक चंद्रकांत पाटील, दिलीप देसाई, जिजाऊ ब्रिगेडच्या सुनीता पाटील, सुधा सरनाईक, अॅड. रवी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. भाई भारत पाटील यांनी आभार मानले.

हेही वाचा 

Back to top button