कोल्हापूर : ग्रा.पं.साठी 84.78 टक्के मतदान

कोल्हापूर : ग्रा.पं.साठी 84.78 टक्के मतदान

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : प्रतिष्ठा पणाला लागलेल्या 73 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात रविवारी चुरशीने 84.78 टक्के मतदान झाले. सायंकाळी उशिरापर्यंत काही गावांमध्ये केंद्रावर रांगा लागल्या होत्या. मतमोजणी सोमवारी (दि. 6) होणार असून दुपारपर्यंत सर्व निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, चिंचवाड (ता. करवीर) येथे दोन गटात वादावादी झाल्यामुळे मतदान केंद्रात गोंधळ झाला. यामुळे काही काळ वातावरण तणावाचे बनले होते. चिंचवाड येथील हा प्रकार वगळता जिल्ह्यात अन्यत्र शांततेत मतदान झाले.

जिल्ह्यातील 89 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या होत्या. माघारीच्या मुदतीपर्यंत 16 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे रविवारी 73 ग्रामपंचायतींमधील कारभारी निवडण्यासाठी मतदान घेण्यात आले. 261 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली होती. सकाळपासूनच मतदानासाठी केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. ज्या गावांमध्ये टोकाची ईर्ष्या आहे, त्या गावांमध्ये एका-एका मतासाठी फिल्डिंग लावली होती. त्यामुळे काही गावांमध्ये सायंकाळी उशिरापर्यंत मतदानासाठी गर्दी होती. करवीर तालुक्यामध्ये सर्वाधिक 88.95 टक्के मतदान झाले. तर सर्वात कमी 78.49 टक्के मतदान भुदरगड तालुक्यात झाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news