कोल्हापूर: शिये येथे मतदान प्रक्रिया पावणे तीन तास रखडली | पुढारी

कोल्हापूर: शिये येथे मतदान प्रक्रिया पावणे तीन तास रखडली

शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा : शिये (ता. करवीर ) येथील ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत प्रशासनाने एकच मतदान यंत्र दिल्याने मतदान प्रक्रिया तब्बल पावणे तीन तास आज (दि.५) रखडली. त्याचा त्रास मतदारांना सहन करावा लागला. त्यामुळे उशिरापर्यत मतदान सुरु राहिले.

येथील प्रभाग क्रमांक चारमध्ये अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून एक सदस्य अपात्र झाल्याने ही पोटनिवडणूक लागली होती. या निवडणुकीसाठी १०५० मतदानापैकी ८५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीची प्रक्रिया सकाळी ७.३० ते सायंकाळी ५ पर्यंत होती. सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर मतदानासाठी मतदार येत होते. मतदान यंत्र एकच असल्यामुळे सकाळपासूनच मतदान प्रक्रिया संथ गतीने सुरू होती. या संथ गतीचा परिणाम पाच पर्यंत प्रक्रिया पूर्ण झाली नाही. तर ती तब्बल रात्री ७. ४५ पर्यंत सुरू होती. शासकीय यंत्रणेच्या चुकीच्या नियोजनामुळे मतदारांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे प्रशासनाच्या या ढिसाळ नियोजनावर अनेक मतदारांनी नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा 

Back to top button