Maratha Reservation Protest | कोल्हापूर जिल्ह्यात मराठा आंदोलनाचा भडका | पुढारी

Maratha Reservation Protest | कोल्हापूर जिल्ह्यात मराठा आंदोलनाचा भडका

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यात आंदोलनाचा वणवा पेटला आहे. आंदोलनाची धग वाढत असून सोमवारी हुपरी (ता. हातकणंगले) येथे टायर पेटवून संतप्त तरुणांनी वाहतूक रोखून धरली. ठिकठिकाणी उपोषण, बंद, नेत्यांना गावबंदी, कँडल मार्च, रास्ता रोको, पोस्टरला काळे फासणे, सदस्यपदाचा राजीनामा आदी विविध प्रकारची आंदोलने करत मराठा आरक्षणासाठी पाठिंबा दिला जात आहे. आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याने जिल्ह्यातील वातावरण तणावपूर्ण होत चालले आहे. (Maratha Reservation Protest)

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे-पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाचे दसरा चौकात तर शौर्य पीठाचे शिवाजी चौकात साखळी उपोषण सुरू आहे. शहरासह जिल्ह्याच्या गावागावांत आंदोलन सुरू आहे. इचलकरंजी बसस्थानकावर राज्य शासनाच्या जाहिरातींना काळे फासण्यात आल्याने तणाव निर्माण झाला. उदगाव (ता. शिरोळ) येथे उपमुख्यमंत्र्यांच्या फलकाला काळे फासण्यात आले. हुपरी येथेही संतप्त तरुणांनी बसस्थानकासमोर टायर पेटवून रास्ता रोको केला.

नरंदे (ता. हातकणंगले) येथे ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला. शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर, शिरटी, हातकणंगले तालुक्यातील कबनूर, तारदाळ, हुपरी कागल तालुक्यातील मुरगूड, मुदाळ तिट्टा, सेनापती कापशी, पन्हाळा तालुक्यातील बांबवडे, गडहिंग्लज, आजरा आदी शहरांसह गावांत मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण झाले. कोडोली (ता. पन्हाळा), सांगरुळ, दोनवडे, बालिंगा, पाडळी खुर्द, खुपिरे (ता. करवीर) येथे कँडल तसेच मशाल मार्च काढण्यात आला.

बांबवड येथे भारतीय दलित महासंघाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. राशिवडे (ता. राधानगरी), परखंदळे (ता. पन्हाळा), बोरवडे (ता. कागल) तसेच चंदगड तालुक्यात लोकप्रतिनिधी, नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Maratha Reservation Protest )

इंगळी (ता. हातकणंगले) येथे सरपंच आणि उपसरपंच यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत खुर्चीवर न बसण्याचा निर्णय घेतला आहे. मुंगुरवाडी गावातील मराठा समाजाने सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. साबळेवाडी (ता. करवीर) येथील माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नामदेव बळवंत पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे सदस्यपदाचा राजीनामा दिला.

Back to top button