कोल्हापूर : कसबा तारळेत मुस्लिम समाज मराठा आरक्षणाच्या आंदोलनासोबत! | पुढारी

कोल्हापूर : कसबा तारळेत मुस्लिम समाज मराठा आरक्षणाच्या आंदोलनासोबत!

गुडाळ; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जारंगे – पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आज मंगळवारी (दि.३१) रोजी कसबा तारळे (ता. राधानगरी) येथील मुस्लिम समाज सरसावला आहे. दरम्यान पुकारण्यात आलेल्या गाव बंद आणि एक दिवसीय उपोषणात कसबा तारळे येथे मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाला आहेत.

संबंधित बातम्या 

गावातील मुख्य चौकात व्यासपीठावर उपोषणाला बसलेल्या मराठा तरुणांच्यासोबत मुस्लिम आणि इतर मागासवर्गीय समाजातील ग्रामस्थही उपोषणाला बसल्याचे चित्र दिसत आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज कसबा तारळे येथे कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. दवाखाने आणि औषध दुकाने वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत. सकाळी बाजारपेठेतील मुख्य चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उपोषणास प्रारंभ झाला.

यावेळी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. विमल पाटील आणि उपसरपंच सौ. रेखा पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला. तसेच मुस्लिम समाजाच्या वतीने हसन नाईक, इतर मागासवर्गीय समाजाच्या वतीने माजी उपसरपंच संजय सुतार यांचीही मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देणारी भाषणे झाली. सायंकाळी सात वाजता बाजारपेठेतून टॉर्च मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती आंदोलकांच्या वतीने देण्यात आली.

Back to top button