नांदेड : मराठा आंदोलनाचे रौद्ररूप; हैदराबाद राज्‍य मार्गावर रास्‍ता रोको आंदोलन, वाहनांच्या रांगा | पुढारी

नांदेड : मराठा आंदोलनाचे रौद्ररूप; हैदराबाद राज्‍य मार्गावर रास्‍ता रोको आंदोलन, वाहनांच्या रांगा

नरसीफाटा ; सय्यद जाफर नायगांव तालुक्यातील हद्दीतील महामार्गावर येणाऱ्या प्रत्येक गावाच्या फाट्यावर मराठा आरक्षण मागणीने रौद्र रूप धारण केले आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवत त्यांच्या आंदोलनाला बळकटी देण्यासाठी काल (सोमवार) मध्यरात्रीपासूनच अनेक ठिकाणी रस्त्यावर टायरे जाळून, लाकडे टाकून चक्काजाम आंदोलन सुरू झाले. शासनाचा निषेध नोंदवत, राजकीय पुढाऱ्यांच्या नावाने शिमगा करत प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. या चक्काजाम आंदोलनामुळे मध्यरात्रीपासूनच महामार्गावर चक्‍काजाम झाला.

दरम्‍यान आज पहाटेपासून प्रवासाला निघालेल्या सामान्य नागरिकांना व प्रकृतीच्या कारणास्‍तव दवाखान्यात जाणाऱ्या रुग्णांना या चक्काजाम आंदोलनाचा चांगलाच फटका बसला आहे. तर सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घुंगराळा येथे एका ॲब्‍युलन्सची तोडफोड करण्यात आली. नांदेडकडून नायगांवकडे येणाऱ्या एका पोलीस व्हॅनलाही संतप्त मराठा तरुणांनी परत पाठवले. पोलिसांचे काहीच काम नाही आम्हाला आमचे आंदोलन करून द्या असा संतप्त पवित्रा आंदोलकानी घेतला.

नायगांव तालुक्यातील हद्दीमध्ये येणाऱ्या नायगांव शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. तर देगाव फाटा, पळसगाव फाटा, घुगंराळा, कुष्णुर, कहाळा, खैरगांव, बेटकबिलोली फाटा तर मुखेड रोडवरील होटाळा, खांडगाव फाटा यासह अनेक ठिकाणी परिसरातील मराठा बांधव मुख्य रस्त्यावर जमा होऊन आरक्षणाच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलनाचे अस्त्र उपसले आहे.

कालच्या मध्यरात्री दरम्यानच घुगंराळा व परिसरातील असंख्य मराठा बांधव मुख्य नांदेड-हैदराबाद रोडवर आरक्षणाच्या मागणीसाठी एकत्र आले. मुख्य मार्गावरील रोडवर येऊन शासनाचा निषेध करत, लोकप्रतिनिधींना, राजकीय पुढाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली. वाहने आडवताना एक ॲम्बुलन्स पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असताना तिला फोडण्यात आले. सदरील अंबुलन्समध्ये कोणताही रुग्ण नव्हता, अशावेळी प्रवासी घेऊन जात असल्याचे कळल्यामुळे ही गाडी आम्ही फोडली असे आंदोलनकर्ते म्हणत होते. तर पोलीस व्हॅन पोलिसांना घेऊन नायगांवकडे येत असताना तिलाही मागे परत पाठविण्यात आले. नांदेड महामार्गावर खैरगांव, बेटक बिलोली फाटा, पळसगांव पाटी, घुगंराळा, कुष्णुर आणि कहाळा येथे रास्ता रोको आंदोलन हे संपूर्ण रस्ते बंद करून रस्त्यावर टायरे जाळून तीव्र पध्दतीने चालू आहे.

नांदेड-हैदराबाद राज्य महामार्गावर चोहीकडे रास्ता रोको आंदोलन चालू असल्यामुळे सर्वत्र वाहनांच्या रंगाचा रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. आज सकाळपासूनच परीक्षेला जाण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांना, दवाखान्याला जाण्यासाठी निघालेल्या रुग्णांना, लहान बालकांना, अंत्यविधीसाठी जाणाऱ्या लोकांना आणि महिलांना या रास्ता रोकोचा चांगलाच फटका बसला आहे. सामान्य जनतेची मात्र या आंदोलनाने एकच तारांबळ उडाली आहे. जागोजागी पोलीस असूनही आंदोलनाचे तीव्र रूप पाहून फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. तर कुंटूर फाट्यावर फौजदार कुसमे, कुष्णूर येथे सपोनि बहात्तरे, पळसगाव फाटा, नायगांव शहरात येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुट्टे हे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांच्या फौजफाट्यासह चोख बंदोबस्त ठेवला आहे.

हेही वाचा :

Back to top button