गतवर्षीच्या उसाला प्रतिटन ४०० रुपये देण्याची कारखानदारांना बुद्धी दे; राजू शेट्टी यांचे बाळुमामाला साकडे | पुढारी

गतवर्षीच्या उसाला प्रतिटन ४०० रुपये देण्याची कारखानदारांना बुद्धी दे; राजू शेट्टी यांचे बाळुमामाला साकडे

मुदाळतिट्टा, पुढारी वृत्तसेवा : गेल्या वर्षी गाळप झालेल्या उसाचे प्रतिटन ४०० रुपये शेतकऱ्याला त्वरित देण्याची बुद्धी साखर कारखानदारांना द्या, शेतकऱ्यांना घामाचे दाम मिळवून देण्यासाठी यश द्यावे, असे साकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी श्री बाळुमामाच्या चरणी घातले.

आदमापूर येथे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली आक्रोश पदयात्रा शनिवारी रात्री उशिरा पोहोचली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.

यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, साखरेचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे यावर्षी कारखान्यांकडून उसाला प्रति टन किती रक्कम मागायची, याचा हिशेब मांडू. आता मागणी केलेली चारशे रुपये रक्कम ताबडतोब शेतकऱ्यांना द्यावी, अन्यथा उसाच्या कांड्याला हात लावू देणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, अजित पवार, बाळासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सावकार मादनाईक, सचिन शिंद, प्रविण शेट्टी, सुर्यभान जाधव, एकनाथ जठार आदीसह राधानगरी, भुदरगड, कागल तालुक्यातील पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button