Navratri 2023 : पहिल्या दिवशी 60 हजार भाविक अंबाबाई चरणी | पुढारी

Navratri 2023 : पहिल्या दिवशी 60 हजार भाविक अंबाबाई चरणी

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  करवीर निवासिनी अंबाबाई दर्शनाला देशभरातून भाविकांचा ओघ सुरू आहे. रविवारी पहिल्या दिवशी 60 हजार भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. दर्शनाला येणार्‍या भाविकांसाठी वैद्यकीय सुविधा, पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात आले होते. तर महालक्ष्मी धर्मशाळेमध्ये 9 हजारांहून अधिक भाविकांनी मोफत महाप्रसादाचा लाभ घेतला. भाविकांच्या सेवेसाठी देवस्थान समितीनेही तत्पर सेवा पुरविल्या. रात्री उशिरापर्यंत मंदिरात गर्दी होती. (Navratri 2023)

रविवारी पहाटेपासून स्थानिक भाविक मंदिराकडे येत होते. आठच्या सुमारास घटस्थापनेचा विधी पार पडला. अकरा वाजता अभिषेक व आरती झाली. यंदा प्रथमच जुना राजवाडा परिसरातील शेतकरी संघाची इमारती दर्शन मंडप म्हणून वापरात आणली आहे. दुपारपर्यंत ओघ सुरूच होता. त्यानंतर काही काळ गर्दी ओसरली. सायंकाळनंतर परजिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने मंदिरात येत होते. जोतिबा डोंगरावरून दर्शन आटोपून अनेक जण अंबाबाई दर्शनाला आले होते.

प्राथमिक उपचारांचा फायदा

गर्दीच्यावेळी भोवळ, अशक्तपणा असा त्रास जाणविणार्‍या भाविकांना मंदिरातील नवग्रह मंदिराशेजारील देवस्थान समितीच्या प्राथमिक उपचार केंद्रात दाखल करण्यात आले. दिवसभरात 27 जणांना प्राथमिक उपचार देण्यात आले. याठिकाणी दोन डॉक्टरांसह स्टाफची नेमणूक दोन शिफ्टमध्ये केली आहे. तसेच व्हाईट आर्मीसह विविध सामाजिक संस्थांनी मंदिर परिसरात वैद्यकीय सेवा दिली.(Navratri 2023)

9 हजारांवर भाविकांना महाप्रसाद

महालक्ष्मी अन्नछत्र व धर्मशाळेच्या वतीने नवरात्र काळात अन्नछत्र सेवेची वेळ सकाळी 11 ते दुपारी 4 अशी करण्यात आली आहे. रविवारी पहिल्याच दिवशी 9 हजार जणांनी अन्नछत्राचा लाभ घेतला. नवरात्र काळामध्ये दररोज 8 ते 10 हजार भाविकांची व्यवस्था करण्यात आल्याचे राजू मेवेकरी यांनी सांगितले.

अंबाबाई भक्त मंडळातर्फे विधी

अंबाबाई भक्त मंडळातर्फे देवीची मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. याठिकाणीही रविवारी 1 हजार भाविकांसाठी मोफत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात केली होती. मंडळाचे अध्यक्ष संजय साळोखे, कार्याध्यक्ष डॉ. प्रमोद बुलबुले, दिलीप कोळी, अरविंद टेळे-पाटील उपस्थित होते.

अतिरिक्त पार्किंगचा फायदा

रविवारी मंदिरात येणार्‍या भाविकांची संख्या वाढत गेल्याने बिंदू चौक, मेन राजाराम हायस्कूल, प्रायव्हेट हायस्कूल ही पार्किंगची ठिकाणे फुल्ल झाली. गांधी मैदान, खानविलकर पेट्रोल पंप परिसर, रंकाळा परिसरात भाविकांची वाहने उभी करण्यात आली होती. अतिरिक्त पार्किंगचा भाविकांना फायदा होत आहे.

पावसामुळे भाविकांची धावपळ

अंबाबाई दर्शनाला रविवारी सकाळपासूनच गर्दी होती. सायंकाळच्या सुमारास काही काळ पावसाचे आगमन झाल्याने भाविकांची धावपळ उडाली. जुना राजवाडा परिसर, महाद्वार रोड, भाऊसिंगजी रोडवर भाविकांनी दुकानांचा आसरा घेतला होता. (Navratri 2023)

हेही वाचा :

Back to top button