Gram Panchayat Election: राधानगरीत दिवाळीपूर्वी १५ ग्रा.पं.मध्ये निवडणुकीचा धुरळा, ५ नोव्हेंबरला मतदान | पुढारी

Gram Panchayat Election: राधानगरीत दिवाळीपूर्वी १५ ग्रा.पं.मध्ये निवडणुकीचा धुरळा, ५ नोव्हेंबरला मतदान

गुडाळ, पुढारी वृत्तसेवा: राज्य निवडणूक आयोगाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम आज (दि.३) जाहीर केला. राधानगरी तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका तर ३ ग्रामपंचायतीमधील पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबररोजी मतदान, तर ६ नोव्हेंबररोजी निकाल जाहीर होणार आहे. १६ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होईल. Gram Panchayat Election

सरवडे आणि कसबा वाळवे या तालुक्यातील दोन मोठ्या ग्रामपंचायतींसह बारडवाडी, चक्रेश्वरवाडी, फेजीवडे अशा काही संवेदनशील गावातही निवडणुकींचा धुरळा उडणार आहे. तालुक्यातील सरवडे, कसबा वाळवे, फेजिवडे, मांगेवाडी, फराळे, रामनवाडी, न्यू करंजे, चांदेकरवाडी, पालकरवाडी, चक्रेश्वरवाडी, बारडवाडी, मालवे, या बारा ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंचपदासह सर्व जागांसाठी निवडणुका होत आहेत. त्याचबरोबर इतर तीन ग्रामपंचायतीमध्येही प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. Gram Panchayat Election

म्हासूर्ली ग्रामपंचायतीमध्ये एका सदस्याचे अतिक्रमण सिद्ध झाल्याने तो अपात्र झाला आहे, कोदवडे ग्रामपंचायतीच्या एका सदस्यांनी राजीनामा दिल्याने तर हसणे ग्रामपंचायतमधील एका सदस्याचा मृत्यू झाल्याने या तीन गावात पोटनिवडणुका होणार आहेत. तालुक्यातील या 15 गावात एकाच वेळी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्व जागांसाठी निवडणूक होणाऱ्या १२ गावात लोकनियुक्त सरपंच पदासाठी थेट मतदान होणार आहे.

 

Gram Panchayat Election : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला कार्यक्रम असा – 

उमेदवार अर्ज दाखल करणे (16 ऑक्टोंबर ते 20 ऑक्टोबर )
उमेदवारी अर्जांची छाननी (23 ऑक्टोबर )
उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा अंतिम दिनांक (25 ऑक्टोबर)
मतदान (5 नोव्हेंबर )
निकाल (6 नोव्हेंबर )

राखीव प्रवर्गातील उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्र निवडून आल्यानंतर बारा महिन्याच्या आत सादर करण्यास मुभा दिली आहे. त्या पद्धतीचे हमीपत्र उमेदवारी अर्ज दाखल करताना द्यावे लागेल. त्यासोबत जात पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत निवडणुका होत असल्याने गावात मतदारांची दिवाळीपूर्वीच दिवाळी होणार आहे.

हेही वाचा 

Back to top button