कोल्हापूर: खिद्रापूरकडे ग्रामसेवकाचे दुर्लक्ष, कारभार ठप्प: ग्रामस्थांचा आरोप | पुढारी

कोल्हापूर: खिद्रापूरकडे ग्रामसेवकाचे दुर्लक्ष, कारभार ठप्प: ग्रामस्थांचा आरोप

कुरुंदवाड: पुढारी वृत्तसेवा: खिद्रापूर (ता. शिरोळ) गावात आठ-आठ दिवस ग्रामसेवक येत नाही. त्यामुळे गाव कारभारावर विपरीत परिणाम होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत गाऱ्हाणे मांडल्यानंतर ‘घ्या सांभाळून, आधी ग्रामसेवक कमी आहेत आणि तुमच्या गावात यायला कुणी तयार नाही’, असे सांगून लोकप्रतिनिधींना नि:शब्द करून परत पाठवले. त्यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, गावातील अतिक्रमण, बेकायदेशीर टॉवर बसवणे, या अर्जासह माहिती अधिकाराखाली मागण्यात आलेली माहिती असे अनेक अर्ज प्रलंबित आहेत. ग्रामसेवक तारीख पे तारीख देत असल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पूर्णवेळ ग्रामसेवक द्यावा, अन्यथा टाळे ठोकू, असा इशारा रामगोंडा पाटील यांनी दिला आहे.

खिद्रापूर गावात बेकायदेशीर टॉवर उभारणी, हेरिटेज गाव म्हणून परिचित असणाऱ्या गावात बेकायदेशीर बांधकामे, अतिक्रमण होत आहेत. याबाबत अनेक ग्रामस्थांनी लेखी तक्रारी दिल्या आहेत. याबाबत ग्रामसेवकांकडून उडवा-उडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांतून होत आहे.

खिद्रापूर, मजरेवाडी या दोन गावांचे कामकाज सांभाळावे लागत आहे. माहिती अधिकार, तक्रार अर्ज निकाली काढले आहेत. कोणालाही उडवाउडवीची उत्तरे दिलेली नाहीत, असे स्पष्टीकरण ग्रामसेवक रवींद्र वैरागी यांनी दिले आहे.

हेही वाचा 

Back to top button