कोल्हापूर : शिवाजी चौकातील ‘त्या’ गणेशमूर्तीचे विसर्जन | पुढारी

कोल्हापूर : शिवाजी चौकातील ‘त्या’ गणेशमूर्तीचे विसर्जन

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळामध्ये गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेवरून शिवसेना शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष गुरुवारी पाहायला मिळाला होता. ठाकरे गटाने बिंदू चौकातून पालखीतून आणलेल्या गणेशमूर्तीची शिवाजी मार्केट प्रवेशद्वाराजवळ मंडप उभारून स्थापना केली होती. या गणेशमूर्तीचे शनिवारी विधिवत विसर्जन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रिक्षा मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीवरून दोन गटांत वाद सुरू आहे. यामध्ये पोलिसांनी दोन्ही गटांना गणेशमूर्ती बसविण्यास मनाई केली होती. दरम्यान, एका गटाने 21 फुटी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना अचानक या मंडपात केली. यावरून शिवसेनेचे दोन्ही गट आमनेसामने आले होते. ठाकरे गटाच्या वतीनेही उत्सवमूर्तीची पालखीने मिरवणूक काढून मंडपात स्थापना करण्याचा प्रयत्न होता.

मात्र, पोलिसांनी वाद टाळण्यासाठी त्यांना शिवाजी मार्केट परिसरात मंडप उभारण्याची विनंती केली. यानुसार त्या ठिकाणी गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली होती. शनिवारी या गणेशमूर्तीची आरती करून दुपारी इराणी खणीमध्ये विसर्जन करण्यात आले. यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, विराज ओतारी, कमलाकर जगदाळे, अभिजित बुकशेठ उपस्थित होते.

Back to top button