Kolhapur News: धामणी तीरावर गवशी-सावतवाडी ग्रामस्थांचा रंगला शिव्यांचा फड

Kolhapur News: धामणी तीरावर गवशी-सावतवाडी ग्रामस्थांचा रंगला शिव्यांचा फड
Published on
Updated on

म्हासुर्ली: पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण जीवनात लोकांच्या मनावर अनेक प्रथा परंपरांनी गारुड केलेले असते. या रुढींची जपणूक आजही तितक्याच श्रद्धेने होताना दिसत आहे. गवशी व सावतवाडी (ता. राधानगरी) ही दोन गावे धामणी नदीच्या तीरावर वसलेली. सामाजिक सलोख्यातून एकमेकांप्रती स्नेहबंध अधिक दृढ असणारी. कोणताही प्रसंग उद्भवला तरी वादापासून चार हात दूर राहणारी. पण वर्षातील एक दिवस या दोन्ही गावांमध्ये वाद होतो. गौरी गणपती विसर्जनादिवशी गावरान, शिवराळ शब्दांनी वादाला तोंड फुटते. आणि आबालवृद्घांपासून महिलांच्या शाब्दीक बाचाबाचीने नदीतीर दणाणून जातो. (Kolhapur News)

धामणी खोऱ्यात काही गावांत अशा परंपरा रूढ झालेल्या आहेत. ज्यांना काही शास्त्रीय आधार नसला तरी त्यातील तथ्य काळानुरूप लोकांना जाणवत आहे. गवशी व सावतवाडी या दोन्ही गावांदरम्यान एक दंतकथा प्रचलित आहे. भैरवनाथ व विठाबाई ही बहिण भावाच्या नात्यातील दोन्ही गावची दैवते. या दोन्ही भावंडांत भांडण होत होते. जरी भांडण झाले तरी त्यात नात्यातील निरागसतेची किनार होती. हीच प्रथा पूर्वीपासून चालत आलेली आहे. दैवतांना संतुष्ट ठेवण्यासाठी या दोन्ही गावांदरम्यान गौरी गणपती विसर्जनादिवशी वाद खेळला जातो. जरी वाद असला तरी त्यालाही निरागसतेची किनार असते. जिथे हातवारे करत शिव्यांच्या लाखोली वाहली जाते. परंतु, सर्वांनाच खळखळून हसविणाऱ्या या कृतीतून भावनिक वातावरण निर्माण होते. (Kolhapur News)

गौरी – गणपतींचे विसर्जन केले जाते. आपआपल्या ग्रामदैवतांना कृपादृष्टीचे साकडे घातले जाते. वाद थांबतो व लोक आपापल्या घरी परतू लागतात. पुन्हा लोक स्नेहाने आनंदाने वागतात. कारण वाद चालू असतो तेव्हा एकमेकांप्रती मनात अजिबात कटुता नसते. आजही येथील वाद अनेक वर्षांपासून अखंड चालत आला आहे. परंतु यात कोठेही कटुता नसते. वर्षातून एक दिवस होणाऱ्या वादातून हास्यकल्लोळ होते. त्यातून आनंद मिळत असतो. तर देवाप्रती श्रद्धाही दृढ होत असते, असे येथील तरुण कृष्णात केसरकर यांनी सांगितले.

येथील चौके – मानबेट परिसरात तीन वर्षांतून एकदा काही दिवस लोक गावपळण प्रथेनुसार गुराढोरांसह गाव निर्मनुष्य करत जंगलात वास्तव्यास जातात. ही एक प्रथा असली तरी त्यानिमिताने निसर्गातील अनेक पैलू लोकांना आत्मसात करता येतात. स्वच्छ वातावरणात ताणतणावमुक्त निखळ आयुष्याचा मनमुराद आनंद घेता येतो. अगदी कोरोना काळात या प्रथेच्या धर्तीवर बावेली येथील लोकांनी गाव सोडत जंगलात राहुट्या बांधल्या होत्या. कोरोनाचा संसर्ग होवू नये म्हणून जंगलात वास्तव्य केले होते. या घटनेवरुन या प्रथेचे महत्व अधोरेखित होते.

गवशी- सावतवाडी दरम्यान पूर्वजांपासून नदीतीरावर वाद रंगला जातो. विचार बदललेत , श्रद्धा अंधश्रद्धेचा हा भाग वाटू लागला. तरी मनात कटुता निर्माण न होता होणारा हा वाद यापुढेही अखंड चालू राहील ही अपेक्षा आहे.

रविंद्र पाटील – गवशी, जिल्हा समन्वयक युवासेना

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news