कसबा बावडा : पुढारी वृत्तसेवा : शुगर मिल चौकापासून ते शिये पुलापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूचे फुटपाथ व बाजूपट्टयांची कित्येक महिने साफसफाई झालेली नाही. दोन्ही बाजूला फुटपाथवर झुडपे, गवत उगवले आहे. शिये पुलाच्या बाजूला कचरा टाकण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. आता तर एका ॲम्बुलन्समधून थेट नदीपात्रालगत वैद्यकीय कचरा टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर कारवाई होणार की नाही ?, असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
आठवडी बाजारानंतर भाजी विक्रेते, फळविक्रेते कचरा रस्त्याकडेला फेकून देतात. औद्योगिक वसाहतीकडे जाणारे अनेक कामगार प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये कचरा आणून शिये पुलाच्या बाजूला फेकून देतात. गेल्या महिन्यात रस्त्याकडेला फेकलेला कचरा शेतकऱ्यांनी उचलून निषेध नोंदवला होता. याबाबत आरोग्य विभागाला कळवूनही कोणतीही कारवाई न केल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूची साफसफाई होत नाही, फळ विक्री करणार्यांचाही रस्त्याकडेला राबता असतो. बाजार संपल्यानंतर आपाआपला कचरा घेऊन जाणे क्रमप्राप्त आहे. शंभर फुटी रस्त्यावर अनेक विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. या ठिकाणचा कचराही शिये पुलाजवळ रस्त्याकडेला फेकला जातो. रविवारी (दि.२४) सकाळी एका ॲम्बुलन्समधील जैव वैद्यकीय कचरा रस्त्याकडेला टाकण्यात आला. यावेळी सतर्क नागरिकांनी याची छायाचित्रे घेत संबंधितांना जाब विचारला असता संबंधितांनी ॲम्बुलन्ससह पोबारा केला.
हेही वाचा