काेल्‍हापूर : राजाराम कारखान्याचे १३४६ पैकी १२७२ सभासद अपात्र ; प्रादेशिक सहसंचालकांचा निर्णय | पुढारी

काेल्‍हापूर : राजाराम कारखान्याचे १३४६ पैकी १२७२ सभासद अपात्र ; प्रादेशिक सहसंचालकांचा निर्णय

कसबा बावडा,पुढारी वृत्तसेवा : येथील श्री छत्रपती राजाराम कारखान्याच्या अपात्र सभासदांबाबत प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी सुनावणी घेऊन बुधवारी (दि.६) निकाल दिला. १३४६ पैकी १२७२ सभासदांना अपात्र तर ७४ सभासदांना पात्र ठरवण्यात आले आहे. अपात्र ठरविण्यात आलेल्या सभासदांमध्ये माजी आम. महादेवराव महाडिक यांच्या परिवारातील १० सदस्यांचा समावेश आहे, अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेस कमिटीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. उच्च न्यायालयात याबाबत आमची याचिका दाखल असून त्याला आम्ही हा निकाल पुरवणी म्हणून जोडणार आहोत, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. (Kolhapur News)

Kolhapur News : खऱ्या सभासदांच्या मालकीचा कारखाना झाला पाहिजे

या वेळी आमदार सतेज पाटील म्हणाले, खऱ्या सभासदांच्या मालकीचा कारखाना झाला पाहिजे, असे आपण सुरुवातीपासून म्हणत होतो. त्याचा विजय झाला आहे. मार्च व एप्रिलमध्ये झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आमचे तगडे उमेदवार बेकायदेशीररित्या अवैद्य ठरवून निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर काढले, कारखान्याच्या निवडणुकीत एकूण ११००० सभासदांनी मतदान केले, त्यापैकी पाच ते साडेपाच हजार मते आमच्या आघाडीला मिळाली. त्यामुळे खऱ्या सभासदांचा कौल आमच्या आघाडीला मिळाला होता, या अपात्र सभासदांमुळेच आमच्या उमेदवारांचा बाराशे ते साडेबाराशे मतांच्या फरकाने पराभव झाला. हे अपात्र सभासद मतदानास पात्र झाले नसते तर कारखान्यात आमची सत्ता असती, असेही ते म्हणाले.

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना कसबा बावडाच्या अपात्र सभासदांना आपली बाजू मांडण्यासाठी प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर विभाग यांनी दोन महिन्याचा अवधी द्यावा, यानंतर पुढील तीन महिन्यात पात्र अपात्रतेबाबतचा निर्णय घ्यावा. असा महत्त्वपूर्ण निर्णय निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या द्वीसदस्यीय खंडपीठाने ४ जानेवारी रोजी दिला होता. कारखान्याच्या यापूर्वी अपात्र ठरविण्यात आलेल्या १३४६ सभासदांपैकी ७०९ सभासदांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, याची अंतिम सुनावणी बुधवार दि. ४ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या द्वि सदसदस्यीय खंडपीठांसमोर झाली होती.

साखर कारखान्याचे १३४६ सभासद अपात्र

सात तालुक्यातील १२२ गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या कसबा बावडा येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे १३४६ सभासद अपात्र असल्याचा निर्णय प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी १४ फेब्रुवारी २०२० रोजी दिला होता. यातील ८०६ अपात्र सभासदांच्या वतीने या निर्णयाविरोधात तत्कालीन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे मार्च २०२० मध्ये अपील दाखल केले होते. सहकार मंत्री यांनी गुरुवार दि. १८ फेब्रुवारी २०२१ रोजी सदरचे सभासद अपात्रच असल्याचा निर्णय दिला होता. सहकार मंत्र्यांच्या या निर्णयाविरोधात अपात्र सभासदांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग यांच्‍या समोर याबाबतची सुनावणी झाली हाेती. यावेळी त्‍यांनी याचिका फेटाळून लावत प्रादेशिक सहसंचालक व तत्कालीन सहकार व पणन मंत्री यांचा आदेश कायम ठेवला होता.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार यापूर्वी अपात्र ठरविण्यात आलेल्या सभासदांबाबत प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर विभाग यांच्या कडे मे व जुन महिन्यात सुनावणी झाली. यावेळी हरकतदार, कारखाना प्रशासन आणि ज्या सभासदांच्या सभासदात्वावर हरकत घेतली आहे, अशा सभासदांचे वकील यांनी युक्तिवाद केला. एक सप्टेंबर रोजी प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी या प्रकरणातील सर्व कायदेशीर बाबी तपासून गुणदोषांवर यापूर्वी अपत्र ठरवलेल्या १३४६ सभासदांपैकी १२७२ सभासदांना अपात्र ठरविले. या पत्रकार परिषदेस कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव माने, शशिकांत खवरे, मोहन सालपे यांच्यासह विरोधी गटाचे उमेदवार, समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button