

विशाळगड; पुढारी वृत्तसेवा : गेळवडे (ता. शाहूवाडी) येथील कासारी मध्यम प्रकल्पात आज (दि १८) ६३.७८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच दिवशी धरणात ५२ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षीपेक्षा यंदा १२ टक्के जादा पाणीसाठा असला तरी उन्हाची तीव्रता पाहता यामध्ये मोठी घट होऊ शकते. यंदा सिंचन व पिण्यासाठी जूनअखेर पाणी उपलब्ध होईल, असे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे.
कासारी परिसरातील पाणी प्रश्न सोडवून परिसरातील जमीन ओलिताखाली येण्याच्या दृष्टीने गेळवडे येथे कासारी नदीवर बाजीप्रभू जलाशय २४ एप्रिल १९७७ मध्ये उभारण्यात आला. त्यासाठी ३३.२८ चौरस किलोमीटरच्या पाणलोट क्षेत्रामध्ये एकूण ७८.५६ दलघमी पाणीसाठा व्हावा, अशा पद्धतीने आखणी करण्यात आली. गेळवडे, गजापूर या गावांचे पुनर्वसन करून ३८०.३० मीटर लांबीचा हा प्रकल्प साकारण्यात आला. शाहूवाडीतील २० व पन्हाळ्यातील ४१ गावातील सुमारे ९ हजार ४५८ एकर सिंचन क्षेत्राला हा प्रकल्प जीवनदायी ठरला आहे.
या धरणाचे बुडीत क्षेत्र ७७०.६१ हेक्टर आहे. धरणावर वीजनिर्मिती प्रकल्प आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता २.७७४ टीएमसी आहे. आज (सोमवारी) धरणाची पाणीपातळी ६१७.२० मीटर इतकी, पाणीसाठा ५०.३२ दलघमी म्हणजे ६३.७८ टक्के, उपयुक्त पाणीसाठा ४९.७२ दलघमी म्हणजे १.७६ टीएमसी धरण सध्या भरले आहे. गतवर्षी याच दिवशी धरणाची पाणीपातळी ६१४.६० मीटर, पाणीसाठा ४९.९३ दलघमी म्हणजे ५२ टक्के होता. उपयुक्त पाणीसाठा ४०.३३ दलघमी म्हणजे १.४२ टीएमसी होता. जुनअखेर कासारी पाणलोट क्षेत्रातील गावांना शेतीसह पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली.
कासारी पाणलोट क्षेत्रात कासारी (गेळवडे) या प्रमुख मध्यम प्रकल्पासह पडसाळी, पोंबरे, नादांरी, कुंभवडे, व केसरकरवाडी हे लघु पाटबंधारे प्रकल्प येतात. उन्हाळ्यात पाणी अडविण्यासाठी कासारी नदीवर जागोजागी कोल्हापूर पद्धतीचे १४ बंधारे आहेत. सध्या धरणातून २५० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
प्रकल्पांतील सध्याचा कंसात गेल्यावर्षीचा पाणीसाठा टीएमसीमध्ये :
राधानगरी ४ (४.३०), तुळशी : २.०२ (२.०३), दूधगंगा : १०.६० (८.७४), वारणा : १२.९८ (१८.२६), कासारी : १.७६ (१.४२), कडवी : १.६७ (१.५३), कुंभी : १.९१ (१.७९), पाटगाव : २.३५ (१.९७).
सध्या तरी शेती, सिंचन, आणि पिण्यासाठी आवश्यक पाणीसाठा धरणांमध्ये आहे. जूनअखेर पाणी पुरेल असे नियोजन करण्यात आले आहे. तरीही दक्षता म्हणून यानंतरही सिंचनासाठी पाणी सोडताना प्रत्येक आवर्तनामध्ये काही दिवस उपसाबंदी जाहीर करावी लागणार आहे. त्याचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून सुरू आहे.
– संदीप दावणे, सहाय्यक अभियंता, पंचगंगा पाटबंधारे विभाग, कोल्हापूर
हेही वाचा :