AI च्या बळावर सायबर गुन्हेगारांची दादागिरी!

AI च्या बळावर सायबर गुन्हेगारांची दादागिरी!
Published on
Updated on

कोल्हापूर; सुनील कदम : कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या वापराबाबत जगभर उलटसुलट चर्चा सुरू आहेत, तोपर्यंतच सायबर गुन्हेगारांनी या तंत्रज्ञानाचा वापरही सुरू केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून जगभरातील सायबर गुन्ह्यांमध्ये दहा टक्के वाढ झाल्याचा निष्कर्ष अमेरिकेतील चेक पॉईंट रिसर्च या संस्थेने काढला आहे. त्यामुळे जगाची चिंता वाढणार आहे.

सर्वाधिक इंटरनेट वापरकर्ते असलेल्या आपल्या देशासाठी आणि राज्यासाठीही ही धोक्याची घंटा आहे. कारण, या तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखण्याची सक्षम यंत्रणा अद्यापही पोलिस खात्याच्या सायबर सेलकडे उपलब्ध असलेली दिसत नाही.

या वर्षाच्या सुरुवातीलाच अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने एक अहवाल प्रसिद्ध करून कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी समूहाच्या द़ृष्टीने विनाशकारी ठरण्याचा इशारा दिला होता. या अहवालात असा दावा करण्यात आला होता की, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या वापरामुळे जगातील मानवी समूहासमोर फार मोठा आण्विक धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे याबाबतीत सध्या जगभर सुरू असलेले प्रयोग रोखले नाहीत, तर संपूर्ण जगापुढेच अस्तित्वाचे संकट निर्माण होऊ शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कोणत्याही समस्येचे उत्तर शोधले जाऊ शकते; पण त्यामध्ये तेवढेच धोकेही दडले असल्याकडे या अहवालाने जगाचे लक्ष वेधले होते. जगभरातील दहशतवादी संघटना किंवा गुन्हेगार या तंत्रज्ञानाचा गैरवापर करून ठिकठिकाणी दहशतवादी कारवाया आणि गुन्हे घडवून आणू शकतात. तसे झाल्यास जगभरात अनेक समस्या नव्याने निर्माण होण्याची भीती या अहवालात व्यक्त करण्यात आलेली होती. तसेच अमेरिकेतीलच फ्यूचर ऑफ लाईफ इन्स्टिट्यूट या संस्थेने जगभरातील सर्व देशांना एक खुले पत्र पाठवून या तंत्रज्ञानाचे सध्या सुरू असलेले सगळे प्रयोग तातडीने बंद करा, असे आवाहन केले होते. आता या संस्थांनी व्यक्त केलेली साशंकता प्रत्यक्षात आकाराला येताना दिसत आहे. चेक पॉईंट रिसर्च या अमेरिकेतील सायबर सुरक्षा कंपनीने सायबर गुन्हेगारी जगताचा मागोवा घेऊन असे निष्कर्ष काढलेले आहेत की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे सायबर गुन्हेगारीचे प्रमाण आठ ते दहा टक्क्यांनी वाढलेले आहे. ही आकडेवारी भारतासाठी धोकादायक आहे. कारण, देशात अद्याप या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतानाच सायबर गुन्हेगारांनी एक पाऊल पुढे टाकत या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापरही सुरू केला आहे.

आज भारतातील 75 कोटी 90 लाखांहून अधिक लोक (52 टक्के) वेगवेगळ्या कारणांसाठी इंटरनेटचा वापर करतात. 2025 पर्यंत हाच आकडा 90 कोटींच्या घरात जाण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. इंटरनेटच्या वापरकर्त्यांपैकी सायबर क्राईमला बळी पडण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक भारतातच आहे. भारतातील इंटरनेटच्या वापरकर्त्यांपैकी 68 टक्के लोक कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या सायबर क्राईमचे बळी ठरलेले आहेत.

हेच प्रमाण अमेरिका 49 टक्के, ऑस्ट्रेलिया 40 टक्के, न्यूझीलंड 38 टक्के, इंग्लंड आणि फ्रान्स 33 टक्के, जर्मनी 30 टक्के, जपान 21 टक्के असे आहे. या आकडेवारीवरून जगात सायबर क्राईमचे सर्वाधिक प्रमाण भारतातच असल्याचे स्पष्ट होते. सायबर क्राईममध्ये महाराष्ट्रही पहिल्या पाच राज्यांमध्ये आहे.

पाचशे भारतीय प्राध्यापक गेले विदेशात!

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान ही दुधारी तलवार आहे. कोण त्याचा वापर कशासाठी करणार, यावर त्या तंत्रज्ञानाचे यशापयश आणि वापर-गैरवापर अवलंबून आहे. गैरवापर झाला, तर तो या तंत्रज्ञानाचा दोष नाही. उदाहरणार्थ, एखाद्या सुरीचा वापर करून भाजी कापायची की माणूस कापायचा, हे वापरकर्त्यावर अवलंबून आहे, त्यामध्ये सुरीचा काही दोष नाही! ज्या पद्धतीने गुन्हेगारी क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे, त्याच पद्धतीने हे तंत्रज्ञान गुन्हेगारी रोखण्यासाठी वापरले, तर त्याचा वापर चांगला होईल. सध्या विद्यार्थ्यांना हे तंत्रज्ञान शिकवण्यासाठी प्राध्यापकांचा दुष्काळ आहे. या तंत्रज्ञानाचे तज्ज्ञ प्राध्यापक तयार करणे ही शैक्षणिक संस्था व विद्यापीठांची जबाबदारी आहे. गेल्या काही वर्षांत देशात पाचशे लोकांनी 'एआय' तंत्रज्ञानाची डॉक्टरेट मिळविलेली आहे. या सगळ्या लोकांना बाहेरच्या देशांनी पळवून नेले. त्यांना तिथे वार्षिक 24 कोटी रुपयांपर्यंत पगार दिला जातो. देशाला असलेला हा एकप्रकारचा 'ब्रेन ड्रेन' किंवा 'मनी ड्रेन'चा धोका आहे. 'एआय'चा वापर जर गुन्हेगार गुन्हेगारीसाठी करीत असतील, तर त्याच तंत्रज्ञानाचा वापर पोलिसांना ढाल किंवा तलवार म्हणूनही करता येऊ शकतो. शासनाने त्यासाठी या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणारी यंत्रणा उभा करण्याची गरज आहे. तसेच 'एआय'चा वापर नैतिक द़ृष्टिकोनातून करण्याची आवश्यकता आहे.

– प्रा. किरणकुमार जोहरे, मविप्रचे केटीएचएम महाविद्यालय, इलेक्ट्रॉनिक सायन्स विभाग, नाशिक (प्रा. जोहरे हे सध्या 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्जचा विधायक उपयोग' या विषयावर पुणे विद्यापीठात पीएच.डी. करीत आहेत.)

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news