कोल्हापूर : शिरोळच्या शरद काळेचा अटकपूर्व जामीन फेटाळला | पुढारी

कोल्हापूर : शिरोळच्या शरद काळेचा अटकपूर्व जामीन फेटाळला

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : दैनिक ‘पुढारी’ व्यवस्थापनाची फसवणूक करून जाहिरात बिलापोटी व्यावसायिक फर्म, संस्था तसेच शासकीय कार्यालयांकडून वसूल झालेल्या १ लाख ६२ हजार ३९३ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या शिरोळ येथील तत्कालीन फ्रीलान्स रिपोर्टर व जाहिरात कमिशन एजंट शरद हरिश्चंद्र काळे (रा. शिरोळ) याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक १) पी. एफ. सय्यद यांनी शुक्रवारी फेटाळला.

दैनिक ‘पुढारी’चे अकौंट मॅनेजर शिवाप्पा हणमंत कुंभार यांनी शरद काळे याच्याविरुद्ध दि. २२ जुलै २०२३ रोजी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल होताच शरद काळे पसार झाला होता. पोलिसांची अटकेची कारवाई टाळण्यासाठी त्याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक १) सय्यद यांच्या न्यायालयात त्याच्या अर्जावर गुरुवारी (दि. १७) सुनावणी झाली होती. सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील अॅड. ए. एम. पिरजादे व दै. ‘पुढारी’च्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. धनंजय पठाडे यांनी न्यायालयात प्रभावी बाजू मांडली होती. त्यावर न्यायालयाने काळे याचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. शरद काळे याची मार्च २०१६ मध्ये फ्रीलान्स रिपोर्टर, जाहिरात एजंट म्हणून नेमणूक करण्यात आली होती.

शिरोळ व परिसरातील जाहिराती घेऊन दै. ‘पुढारी’ कार्यालयात प्रसिद्धीसाठी पाठविणे, जाहिरात बिलाची वसुली करून संबंधित रक्कम बँकेत जमा करण्याची त्याच्यावर जबाबदारी होती. दरम्यान, काळे याने शिरोळ येथील शैक्षणिक संस्था, व्यावसायिक फर्म, शिरोळ तहसीलदार, शिरोळ पंचायत समिती कार्यालयासह शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने- पाटील यांच्याकडून प्रसिद्धीस दिलेल्या जाहिरात बिलापोटीची रक्कम रोख तसेच स्वतःच्या नावे धनादेश घेऊन दै. ‘पुढारी’ कार्यालयाकडे संबंधित रक्कम जमा न करता त्याचा परस्पर अपहार केला. दै. ‘पुढारी’मध्ये काळे याने प्रसिद्धीस दिलेल्या जाहिरात बिलाची एकूण रक्कम १ लाख ६२ हजार ३९३ रुपये होते. जाहिरात बिलाची संपूर्ण रक्कम दै. ‘पुढारी’ कार्यालयाकडे जमा न करता स्वतःकडे ठेवून घेतली आहे. शरद काळे याच्याविरुद्ध भारतीय दंडविधान संहिता ४२०, ४०८ अन्वये लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक अविनाश कवठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भगवान गिरी गोसावी, हवालदार संजय कोळी तपास करीत आहेत. शरद काळे याला कोणत्याही क्षणी अटक करण्यात येईल, असेही तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

Back to top button