कोल्हापूर : पन्हाळ्यातील पूर परिस्थितीची तहसीलदार शिंदे यांच्या कडून पाहणी | पुढारी

कोल्हापूर : पन्हाळ्यातील पूर परिस्थितीची तहसीलदार शिंदे यांच्या कडून पाहणी

पन्हाळा, पुढारी वृत्तसेवा : पन्हाळा तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असून पन्हाळा पश्चिम भागातील गोठे, सुळे माजगाव पुलावर पाणी आले आहे. तर बाजार भोगाव, बच्चे सावर्डे, बंधाऱ्यावर देखील पाण्याची पातळी वाढली आहे, त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाची रिपरिप अखंड सुरू आहे. तालुक्यातील कासारी, जांभळी, धामणी नद्या दुथडी भरून वाहात आहेत. पन्हाळा तालुक्यात पाऊसाची संततधार चालुच आहे.पन्हाळा पश्चिम भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे.त्यामुळे तलाव व धरणे आणि नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून पन्हाळा तहसिल आपत्ती विभाग लक्ष ठेऊन आहे. आज दुपारी पन्हाळा तहसिलदार माधवी शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांनी परिस्थितीची पहाणी केली. तसेच पोहाळावाडी येथील भुसखलंन होणाऱ्या परिसराची पहाणी केली. जांभळी खोऱ्याचे प्रवेशव्दार असणाऱ्या काऊरवाडी जवळील भिवराज मंदिराजवळ पुराचे पाणी आल्याने या परिसराचा संपर्क तुटला आहे.

बाजारभोगावच्या बाजारपेठेतील २० पेक्षा जास्त दुकानात पाणी शिरले असून दुकानदारांनी आपले साहित्य हलवण्या सुरुवात केली आहे. बाजारभोगाव ते पोहाळे तर्फ बोरगाव दरम्यान असणाऱ्या मोरीवर पाणी असल्याने कोल्हापूर, बाजारभोगाव, अणुस्करा, राजापूर हा राज्यमार्ग बंद झाला आहे. मुसळधार पावसामुळे कासारी प्रकल्प ७८.५३ टक्के भरला असून या प्रकल्पातून ७५० क्युसेक प्रति सेकंद विसर्ग सूरू आहे.

तसेच बाजारभोगाव येथे आबासाहेब भोगावकर हायस्कूलमध्ये केलेल्या ग्रामस्थांच्या तात्पुरत्या निवास केंद्राची पाहणी तहसिलदार  माधवी शिंदे जाधव यांनी केली. तर कळे-गगनबावडा या मुख्य रस्त्यावर पाणी आले असून त्याठिकाणची पहाणी केली. तसेच गोठे पुलावर जाऊन ही पूर परिस्थितीची पहाणी केली. नदी क्षेत्रात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने या भागातील नागरिकांनी सतर्क रहावे व प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनाचे पालन करावे असे तहसिलदार माधवी शिंदे-जाधव यांनी जाहीर केले आहे पन्हाळा आपत्ती व्यवस्थापन कक्ष चोवीस तास खुला असून या ठिकाणी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कळे ठाण्याचे सहायक पोलिस निरक्षक. रणजीत पाटील, बाजारभोगाव मंडल अधिकारी नलिनी मोहिते, परिमंडल वनाधिकारी नाथा पाटील, वनरक्षक एम. डी. नवाळे, तलाठी प्रज्ज्योत निर्मळे, वीणा कांबळे, अनिल पर्वतेवार, ग्रामसेवक रामचंद्र वाघमारे, पोलिसपाटील छाया पोवार, योगेश जाधव, कोतवाल संभाजी कुंभार, संदीप पाटील आदी उपस्थित होते.नदीकाठच्या कुटूंबाना सतर्कतेचा इशारा दिला आहे.सुरक्षित ठिकणी स्थलांतर व्हावे अश्या तलाठी यांच्या मार्फत सूचना दिल्या आहेत. तसेच पन्हाळा तालुक्यातील संभाव्य भुसखलन क्षेत्रा नजीक रहिवाशी कुटूंबाना पन्हाळा तहसिलदार यांच्या मार्फत स्थलांतराच्या नोटीस काढण्यात आल्या आहेत. तलाठी व पोलिसांनी संभाव्य भुसखलनाचा धोका असलेल्या कुटूंबाना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर व्हावे अश्या सूचना दिल्या आहेत. जास्त धोका असलेल्या कुटूंबियांना स्थलांतर केले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button