रासायनिक पदार्थ NASA विकत घेणार असल्याचा विश्वास देऊन दाम्पत्याची दीड लाखांची फसवणूक | पुढारी

रासायनिक पदार्थ NASA विकत घेणार असल्याचा विश्वास देऊन दाम्पत्याची दीड लाखांची फसवणूक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : केरळ येथील मुन्नर जिल्ह्यात एका शेतात वीज पडुन त्यामध्ये त्यांना एक द्रव सापडला आहे. तो द्रव पदार्थ सॅटेलाईटमध्ये वापरला जात असून तो पदार्थ नासा विकत घेणार असल्याचे आमिष दाखवून एकाला 1 लाख 65 हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतीश प्रकाश धुमाळ (46) आणि वैशाली सतीश धुमाळ (42, रा. मॅजेस्टीक नेस्ट, फुरसुगी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत शशिरेखा प्रभाकर महिंद्रकर (65, रा. फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिंद्रकर आणि आरोपी दाम्पत्य फुरसुंगी परिसरात राहण्यास आहेत. महिंद्रकर यांना धुमाळ यांची 1 लाख 65 हजार रुपयांची फसवणूक केली.  संबंधित फसवणूकीचे प्रकरण 12 ऑक्टोबर 2022 ते एप्रिल 2023 दरम्यान घडले आहे. फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर महिंद्रकर यांनी पोलिसांत याची तक्रार दिली.

धुमाळ यांनी द्रव पदार्थ विकत दाम्पत्याला घातला गंडा

धुमाळ यांनी महिंद्रकर यांना सांगितले की, केरळ येथील मुन्नर जिल्ह्यातील एका शेतात वीज पडली आहे. ही वीज पडल्याने त्या शेतात एक द्रव पदार्थ सापडला असून तो पदार्थ सॅटेलाईट बनविण्यासाठी वापरतात. हा पदार्थ आता नासा विकत घेणार असल्याची माहिती धुमाळ यांनी महिंद्रकर यांना दिली. त्यानंतर धुमाळ यांनी आम्हाला पैशांची गरज आहे असे सांगून फियार्दी महिंद्रकर यांच्याकडून तब्बल 1 लाख 65 हजार रूपये घेतले. हा सर्व प्रकार 12 ऑक्टोबर 2022 ते एप्रिल 2023 मध्ये घडला. पैसे मागूनही परत मिळत नसल्याने व आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर महिंद्रकर यांनी धुमाळ दाम्पत्याविरोधात आता हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा

Back to top button