MPSC PSI Result: मोसम येथील अजय कांबळेची फौजदार पदाला गवसणी | पुढारी

MPSC PSI Result: मोसम येथील अजय कांबळेची फौजदार पदाला गवसणी

विशाळगड: पुढारी वृत्तसेवा : परिस्थिती कशीही असो, मात्र जिद्द, चिकाटी आणि अभ्यासाची तयारी असल्यास नशिबाचे फासे फिरवता येतात, कोणताही वारसा नसतानाही अधिकारी होण्याचे स्वप्न साकारता येते. याची प्रचिती दुर्गम भागातील मोसम (ता. शाहूवाडी ) येथील शेतकरी कुटुंबातील अजय काशिनाथ कांबळे यांनी दिली. वडिलांचे छत्र हरपले असताना शेतात घाम गाळणाऱ्या निरक्षर आईच्या लेकाने ज्ञानाच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाला (MPSC PSI Result) गवसणी घातली.

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी (MPSC PSI Result)  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२१ मध्ये झालेली पूर्व परीक्षा त्याने दिली होती. या पूर्व परीक्षेत पात्र होऊन तो सप्टेंबर २०२२ मध्ये झालेल्या मुख्य परीक्षेला सामोरा गेला, या परीक्षेत त्याने २६५ गुण मिळवून उत्तीर्ण झाला. दरम्यान फेब्रुवारी २०२३ मध्ये नाशिक येथे शारीरिक चाचणीत १०० पैकी ९५ इतक्या गुणांनी उत्तीर्ण झाला. तर या परीक्षेचा शेवटचा टप्पा असलेली प्रत्यक्ष मुलाखतीमध्ये २० गुण प्राप्त केले.

अजयचे प्राथमिक शिक्षण विद्या मंदिर मोसम या जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण रासाई माध्यमिक विद्यालय मांजरे येथे तर महाविद्यालयीन शिक्षण स्वामी विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथे पूर्ण केले. इस्लामपूर येथे सेल्फस्टडी केला. त्याला मित्रांचे मार्गदर्शन लाभले. पोलीस अधिकारी बनायचेच ही जिद्द ठेवलेल्या अजयने अवघ्या तिसऱ्या प्रयत्नात हे यश संपादन केले आहे. त्याचे वडील वन विभागात कार्यरत होते. त्यांची सेवासमाप्ती झाल्यानंतर अवघ्या चारच दिवसांत त्यांचे आकस्मित निधन झाले होते.

अजयची आई गृहिणी आहे. तर मोठे बंधू शेतकरी आहे. अजयला मोठ्या बहिणीचे खूप सहकार्य लाभले. छोट्याशा खेडेगावात राहणाऱ्या अजयचे यश ग्रामीण युवक व युवतींसाठी प्रेरणादायी आहे. नुकताच बारा गाव विशाळगड विभागाच्या वतीने अजयचा भाततळी येथे सत्कार करण्यात आला. यावेळी पांडुरंग कांबळे, यशवंत कांबळे आदींसह विशाळगड विभागाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button