आजरा : रामतीर्थ धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी; तालुक्यात वर्षा पर्यटनाला सुरुवात | पुढारी

आजरा : रामतीर्थ धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी; तालुक्यात वर्षा पर्यटनाला सुरुवात

सोहाळे : सचिन कळेकर :  आंबोली परिसरात सुरु असलेल्या पावसामुळे हिरण्यकेशी नदी प्रवाहीत झाली असून आजऱ्यापासून दीड कि.मी. अंतरावर असलेल्या रामतीर्थ पर्यटनस्थळावरील धबधबा वाहू लागला आहे. गेल्या पाच दिवसापासून हा धबधबा प्रवाहीत झाला असून गुरुवारी असलेल्या शासकीय सुट्टीमुळे अनेक जणांनी आपल्या कुटुंबासमवेत धबधबा पाहण्यासाठी गर्दी केली होती. तालुक्यात वर्षा पर्यटनाला सुरुवात झाली असून हळूहळू पर्यटकांची गर्दी होत आहे.

आजरा तालुक्यात पर्यटन स्थळातील महत्वाचे स्थळ म्हणजे, रामतीर्थ होय. रामतीर्थवरील धबधबा प्रसिध्द असून धबधबा पाहण्याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक या परिसरात येतात. वर्षा पर्यटनाची एक दिवसाची सहल करतात. दरवर्षी शेकडो पर्यटक या स्थळाला भेट देतात. खडकातून आणि हिरव्या गर्द झाडीतून वाहणारी हिरण्यकेशी नदी, धबधब्यातून कोसळणारे पांढरे शुभ्र पाणी हे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची दरवर्षी गर्दी असते.

आंबोली परिसरासह तालुक्याच्या पश्चिम भागात सुरु असलेल्या पावसामुळे हिरण्यकेशी नदी प्रवाहीत झाली असल्याने गेल्या चार ते पाच दिवसापासून धबधबा वाहू लागला आहे. त्यामुळे पर्यटकांची पावले रामतीर्थकडे वळू लागली आहेत. गुरुवारी आषाढी एकादशी व रमजान ईदची शासकीय सुट्टी असल्याने या दिवशी अनेक मंडळींनी आपल्या कुटुंबासमवेत रामतीर्थ धबधबा पाहण्यासाठी गर्दी केली होती. सकाळच्या सत्रात काही तुरळक पर्यटक होते. मात्र, दुपारनंतर पर्यटकांची संख्या वाढली.

श्रीराम मंदिर, पिंपळ्या मारुती, महादेवाचे दर्शन घेवून पर्यटक धबधबा पाहण्यासाठी जात होते. त्यातच अधुनमधून पावसाच्या कधी मोठ्या, कधी हलक्या सरी कोसळत होत्या. याचाही आनंद पर्यटक घेत होते. खबरदारी म्हणून नगरपंचायत व तालुका प्रशासनाकडून धबधब्याशेजारील नदीमध्ये उतरून जाण्याचे गेट बंद केले असल्याने पर्यटकांनी त्या ठिकाणी असलेल्या रॅम्पवर जावून धबधबा पाहण्याचा आनंदा घेतला. रामतीर्थ धबधबा पाहून अनेक पर्यटक आंबोलीच्या दिशेने निघून जात होते.

एकंदरीत रामतीर्थ धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची हळूहळू गर्दी होत आहे. पर्यटकांची संख्या वाढत असल्याने स्थानिक व्यावसायिकांमधूनही समाधान व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा : 

Back to top button