पुणे : वेळवंड खोर्‍यात विजेचा खेळखंडोबा | पुढारी

पुणे : वेळवंड खोर्‍यात विजेचा खेळखंडोबा

भोर : पुढारी वृत्तसेवा :  वेळवंड खोर्‍यात गेल्या सहा महिन्यांपासून विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. त्यामुळे त्रस्त नागरिकांनी बुधवारी (दि. 28) महावितरण कार्यालयात येऊन संबंधित अधिकार्‍याला घेराव घातला. आमचा वीजपुरवठा कधी सुरळीत करणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. येथील वीजपुरवठा लवकरच सुरळीत करू, असे आश्वासन संबंधित अधिकार्‍यांनी ग्रामस्थांना दिले.
वेळवंड खोर्‍यातील डोंगराळ भाग असलेल्या पांगारी, डेहेण, नानावळे, शिंदेवाडी, बुरुडमाळ, कोंडगाव, हुंबेवस्ती, सोनारवाडी, सांगवी, साळुंगण, जळकेवाडी, झानेरे या गावांतील नागरिकांना गेल्या सहा महिन्यांपासून नियमित व सुरळीत वीजपुरवठा होत नाही. त्यामुळे विविध समस्यांना सतत तोंड द्यावे लागत आहे. यात प्रामुख्याने रात्री प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यात उजेडासाठी लागणारे रॉकेल उपलब्ध नाही. त्यामुळे रात्र अंधारातच काढावी लागत आहे.

उन्हाळ्यात त्रास सहन केला, परंतु आता पावसाचे दिवस आहेत. मुलांचा अभ्यास, नळाचे पाणी, मोबाईल चार्जिंग, स्वयंपाक करताना उजेड, गुरांच्या धारा काढताना होणारा त्रास, याचबरोबर डोंगराळ भाग असल्याने सरपटणार्‍या साप, विंचू आदी प्राण्यांची भीती निर्माण झाली आहे. शेवटी येथील नागरिकांनी विजेच्या समस्येला कंटाळून भोर येथील महावितरणाच्या कार्यालयात येऊन अधिकार्‍यांसमोर समस्यांचा पाढा वाचत आक्रमक पवित्रा घेतला होता. वीजपुरवठा सुरळीत सुरू राहावा, यासाठी ग्रामस्थांनी महावितरणचे कनिष्ठ अभियंता एस. एस. साबळे यांना निवेदन दिले. पुढील काही दिवसांत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर आंदोलनाचा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे.

या वेळी विठ्ठल गोरे, संतोष पावगे, दिनकर दुरकर, बाळू दुरकर, अनिल परांजपे, मेघा परांजपे, सुनीता दुरकर, सखुबाई दुरकर, सीताबाई दुरकर, सुरेखा दुरकर, दत्ता गोरे, रामभाऊ गोरे, बाळू गोरे, सचिन दुरकर, विकी दुरकर, बापू दुरकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

गेल्या सहा महिन्यांपासून वीजपुरवठा खंडित होत आहे. फिडरच्या दुरुस्तीचे काम चालू आहे असे गेल्या सहा महिन्यांपासून सांगितले जातेय. दुरुस्तीला सहा-सहा महिने लागत असतील, तर वीज नसल्यामुळे होणार्‍या समस्यांचा सामना नागरिकांनी कसा करायचा हा खरा प्रश्न आहे. अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा जनांदोलन करण्यात येईल.

Back to top button