नागपूर : ग्रीन जिमवरून जिल्ह्यात तापले रामटेकचे वातावरण; कृपाल तुमाने म्हणाले… | पुढारी

नागपूर : ग्रीन जिमवरून जिल्ह्यात तापले रामटेकचे वातावरण; कृपाल तुमाने म्हणाले...

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेने कौशल्य विकासअंतर्गत जिल्ह्यातील १० ते १२ गावांमध्ये ग्रीन जिम लावण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर या कामाला अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी विरोध केला. ग्रीन जिम हे कौशल्य विकासच्या लेखाशिर्षात येत नसल्याचे कॉंग्रेस नेत्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. यामुळे नागपूर जिल्ह्याचे वातावरण चांगले तापले आहे.

रामटेक लोकसभा मतदारसंघात जिल्हा खनिज कल्याण निधी हा आरोग्य सुविधांवर खर्च करण्याऐवजी सुमारे १३ कोटी रुपयांची उधळपट्टी ग्रीन जिमवर करण्यात आली. हे काम नियमबाह्य असल्याची शंका गेल्यावेळी प्रतिस्पर्धी उमेदवार असलेले किशोर गजभिये, गज्जू यादव या काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली. यावर खासदार कृपाल तुमाने यांनी उत्तर देण्याची मागणी पत्रकार परिषदेत केली.

गैर काहीही नाही, तुम्हाला शंका असेल तर एसआयटीमार्फत चौकशी करा, असे आवाहन रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी केले. यासंदर्भात काँग्रेसचे नेते उदयसिंह यादव आणि किशोर गजभिये यांनी सांगितले की, या खनिज निधीसाठी खासदार तुमाने यांनी दोनदा शिफारस पत्र दिले. त्यांच्या पत्रावरून एजन्सी बदलण्यात आली होती. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना, जिल्हा खनिज प्रतिष्ठान नागपूर अंतर्गत कौशल्य विकासासाठी रामटेक, उमरेड, कुही, भिवापूर, कामठी, मौदा, नागपूर ग्रामीण, पारशिवनी, सावनेर, नरखेड व कळमेश्वर तालुक्यातील २०० गावांमध्ये ग्रीन जिम लावण्यास मंजुरी देण्यात आली.

खासदार तुमाने यांच्या पत्रावर या योजनेला तत्कालीन जिल्हाधिकारी विमला यांनी मंजुरी दिली. ग्रीन जिम लावण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी यांना नोडल एजन्सी नियुक्त करण्याची शिफारस करण्यात आली. त्यानंतर खासदार तुमाने यांनी पत्र देऊन जिल्हा परिषदेकडे हे काम देण्याची सूचना केली होती. अर्थातच यानुसार जिल्हा परिषदेने कौशल्य विकासअंतर्गत जिल्ह्यातील १० ते १२ गावांमध्ये ग्रीन जिम लावण्याच्या हालचाली सुरू केल्या. या कामाला विरोध आहे. ग्रीन जिम उभारणे हे कौशल्य विकासच्या लेखाशिर्षात येत नसल्याचे विरोधकांचे मत आहे.

खनिज कल्याण निधीचा उपयोग प्रभावित क्षेत्रातील आरोग्य सुविधेवर अपेक्षित आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याची माहिती देण्यात आली आहे. ग्रीन जिममधील साहित्यासाठी मूळ किमतीपेक्षा दुप्पट खर्च करण्याचे प्रयत्न केले जात आहे. या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचेही यादव यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जिल्ह्यातील अनेक सरपंचांनी ग्रीन जिम लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार आपण शिफारस केली. मविआचे सरकार असताना तत्कालीन पालकमंत्री नितीन राऊत यांनी मंजुरी दिली. या झालेल्या खर्चाबाबत शंका असल्यास या सर्व प्रकरणाची एसआयटी स्थापन करून चौकशी करावी, असे खासदार कृपाल तुमाने यांनी म्हटले आहे. एकंदरीत रामटेक लोकसभा मतदारसंघात आता मविआविरुद्ध शिवसेना संघर्ष अटळ दिसत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

हेही वाचा :  

Back to top button