अमेरिकेच्या बाजारात आता कोंबडीचे कृत्रिम मांस! | पुढारी

अमेरिकेच्या बाजारात आता कोंबडीचे कृत्रिम मांस!

वॉशिंग्टन ः आता कृत्रिम मांसाची विक्रीही सुरू झाली आहे. अमेरिकेत प्रयोगशाळेमध्ये तयार केलेल्या अशा कोंबडीच्या मांसाची विक्री करण्यास अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. अशाप्रकारचे कोंबडीचे कृत्रिम मांस विकण्याची ही अमेरिकेतील पहिलीच वेळ आहे. या मांसासाठी कोंबडीला मारण्याची आवश्यकता नसते. विशिष्ट स्टील टँक्समध्ये कोंबडीच्या पेशींचा वापर करून असे मांस विकसित केले जाते.

कॅलिफोर्नियातील दोन कंपन्यांना याबाबत यूएस डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅग्रीकल्चर (यूएसडीए) कडून परवानगी देण्यात आली आहे. ‘अपसाईड फूडस्’ आणि ‘गूड मीट’ अशी या दोन कंपन्यांची नावे आहेत. प्रयोगशाळेत कोंबडी उत्पादने विकसित करणे आणि त्यांची विक्री करणे यासाठी त्यांना परवानगी देण्यात आली आहे. प्रयोगशाळेत मांस तयार करण्याच्या या प्रक्रियेला ‘कल्चर्ड’ किंवा ‘कल्टिव्हेटेड मीट’ असे म्हटले जाते. एखाद्या जिवंत प्राण्याच्या ऊती म्हणजेच पेशींच्या समूहातून काही पेशी नमुन्यासाठी घेऊन ही प्रक्रिया सुरू केली जाते. अशा पेशी घेत असताना संबंधित प्राण्याला कायमची इजा होत नाही किंवा त्याचा मृत्यूही होत नाही.

या पेशीनंतर एका सेल बँकमध्ये साठवल्या जातात. त्यानंतर या पेशी घेऊन त्या मोठ्या स्टील टँकमध्ये ठेवून वाढवल्या जातात. हे टँक म्हणजे एखाद्या बायोरियाक्टरसारखी उपकरणे असतात. त्यामध्ये या पेशींची वेगाने वाढ होते. उत्पादक कंपन्या पेशींना पोषक घटक देतात. कोंबडीच्या नैसर्गिक मांसात जे पोषक घटक असतात ते या पेशींपासून निर्माण केलेल्या मांसातही असतात. अशा प्रकारचे कृत्रिम मांस हे सुरक्षित असावे यासाठी 2019 मध्ये अमेरिकेच्या अन्न व औषध विभागाने तसेच ‘यूएसडीए’ने काही नियम घालून दिले होते. त्या नियमांनुसार हे काम केले जात असते. आता असे ‘लॅब-ग्रोन चिकन’ अमेरिकेतील सर्व किराणा दुकाने, मॉलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

संबंधित बातम्या
Back to top button