

बांबवडे; पुढारी वृत्तसेवा : अमेणी पैकी खोंगेवाडी (ता. शाहूवाडी) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला कायमस्वरूपी शिक्षक उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाहूवाडी पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी गट विकास आधिकारी आर. पी. बघे, शिक्षण विस्तार अधिकारी रंजना कुंभार यांना निवेदन देण्यात आले.
अमेणी पैकी खोंगेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग भरतात. शालेय वर्ष सुरु होऊन आठ दिवस झाले. तरीही अद्याप या शाळेत शिक्षकच हजर न झाल्यामुळे विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. येथे शिक्षण विभागाने आलटूनपालटून सोयीप्रमाणे शिक्षक पाठवून देण्यापेक्षा शाळेला कायमस्वरुपी शिक्षक द्यावेत अन्यथा शाहूवाडी पंचायत समिती तसेच कोल्हापूर जिल्हा परिषद कार्यालयासमोर यापुढे बेमुदत उपोषण करणार, असा इशारा विद्यार्थांनी शाहूवाडीचे गटविकास अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी यांना निवेदनातून दिला आहे.
यावेळी संतोष कदम, बाजीराव चौगूले, मंगल कुडापणे, शरद कुडापणे, चंद्रकांत कदम, अनिल कदम, शेखर येडगे, संदिप यादव, शशिकांत यादव, रेखा कदम, रमेश कदम, आनंदा कदम, पांडूरंग कदम आदी उपस्थित होते .
'शाळेला नियमित आणि पुरेसे शिक्षक देण्यात शिक्षण विभाग नेहमीच कमी पडलेला आहे. या अन्यायाचे निवारण वेळेत व्हावे. प्रशासनाने विद्यार्थी, पालक यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये.'
आनंदा कुडापणे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती खोंगेवाडी'तालुक्यात २२९ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. अशावेळी सर्वच शाळांना शिक्षक देणे, आणि समतोल राखणे अशक्य आहे. तरीही खोंगेवाडी शाळेला पर्यायी शिक्षक देण्याची व्यवस्था केली आहे.'
रंजना कुंभार शिक्षण विस्तार अधिकारी, (शाहूवाडी पं.स)
हेही वाचलंत का ?