कोल्हापूर : शाहूवाडीतील १२ ग्रामपंचायतींची बुधवारी प्रभाग रचना! | पुढारी

कोल्हापूर : शाहूवाडीतील १२ ग्रामपंचायतींची बुधवारी प्रभाग रचना!

सरुड; पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुक्यातील जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत कार्यकाळ समाप्त होणाऱ्या एकूण १२ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया राबविण्याची प्रशासकीय पातळीवर हालचाल सुरू आहे. जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या आदेशानुसार ग्रामपंचायतींच्या निवडणूक पूर्वतयारीच्या अनुषंगाने प्रभाग रचनेसाठी आरक्षण सोडत बुधवारी (ता.२१) आहे. अशी माहिती तहसीलदार रामलिंग चव्हाण, नायब तहसीलदार रवींद्र मोरे यांनी दिली.

दरम्यान तालुक्यातील सावर्डे खुर्द, सुपात्रे, मालेवाडी, सावे, आकुर्ळे, शेम्बवणे, वालुर/जावळी, माण/पातवडे, कासार्डे, ऐनवाडी/धनगरवाडी, गेळवडे, गावडी या १२ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ जानेवारी २०२३ ते जून २०२३ या कालावधीत समाप्त झाला आहे. डिसेंबर २०२३ अखेर आणखी काही ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. या सर्व ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक पूर्वतयारी पूर्ण करण्याचे जिल्हा निवडणूक प्रशासनाचे निर्देश तहसील कार्यालयाला प्राप्त झाले आहेत.

यानुसार, ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेसाठी बुधवारी (ता.२१) होणाऱ्या आरक्षण सोडत प्रक्रियेसाठी अध्यासी अधिकाऱ्यांची तसेच सहायक म्हणून स्थानिक तलाठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये कार्यरत आठ तलाठी संबंधित १२ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना प्रक्रिया राबविणार आहेत. नियुक्त अध्यासी अधिकाऱ्यांनी प्रभागांचे आरक्षण निश्चित केल्याबाबतचे (परिशिष्ट १२ प्रमाणे) इतिवृत्तासह अहवाल बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत कार्यालयास सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही तहसीलदार रामलिंग चव्हाण, नायब तहसीलदार रवींद्र मोरे यांनी सांगितले.

हेही वाचा;

Back to top button