Pakistan-China Nuclear Deal : चीन पाकिस्तानात उभारणार अणुऊर्जा प्रकल्प! | पुढारी

Pakistan-China Nuclear Deal : चीन पाकिस्तानात उभारणार अणुऊर्जा प्रकल्प!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Pakistan-China Nuclear Deal : आर्थिक संकटातून जात असलेल्या पाकिस्तानला पुन्हा एकदा चीनचा पाठिंबा मिळाला आहे. मंगळवारी दोन्ही देशांमध्ये अणुऊर्जा प्रकल्पा उभारणीचा करार झाला. या कराराअंतर्गत चीनकडून पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात 1200 मेगावॅट क्षमतेचा अणुऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. हा 4.8 अब्ज अमेरिकन डॉलर किमतीचा करार असल्याचे समोर आले आहे. कराराच्या प्रसंगी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ उपस्थित होते.

शरीफ म्हणाले की, पंजाब प्रांतातील मियांवली जिल्ह्यात चीनच्या सहकार्याने अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प कोणताही विलंब न करता पूर्ण होईल, असे सांगून माजी पंतप्रधान इम्रान खान सरकारवर प्रकल्पाला दिरंगाई केल्याचा आरोप केला.

गंभीर आर्थिक संकटाच्या काळात पाकिस्तानला चीनकडून 4.8 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक मिळत आहे. चिनी कंपन्यांना पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करण्याबाबत अजूनही विश्वास आहे, असा संदेश यातून जाईल, असेही शरीफ म्हणाले.

शहबाज शरीफ म्हणाले की चीनी कंपन्या विशेष सवलत देतील, ज्यामुळे कोट्यवधी रुपये या प्रकल्पातून वाचतील. चीन आणि इतर मित्र देशांच्या मदतीने पाकिस्तान आर्थिक संकटातून बाहेर येईल, असा विश्वास शरीफ यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी चीनसोबतच सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि कतार यांनी केलेल्या मदतीबद्दल आभार मानले. कर्जासाठी पाकिस्तान IMF सोबत चर्चा करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Back to top button