कोल्‍हापूर : हेरवाड गावात दुष्काळजन्य परिस्थितीतही पाणीपुरवठा सुरळीत | पुढारी

कोल्‍हापूर : हेरवाड गावात दुष्काळजन्य परिस्थितीतही पाणीपुरवठा सुरळीत

कुरुंदवाड : जमीर पठाण दूधगंगा नदी कोरडी पडली आहे. अशा पाणीबाणीच्या परिस्थितीवरही हेरवाड ग्रामपंचायतीने मात केली आहे. त्‍यासाठी गावातील कुपनलिकेच्या पाण्याचा उपसा करून फिल्टर हाऊसद्वारे पाण्याच्या टाकीत लिफ्ट करून नळ पाणीपुरवठा योजना सुरळीत करत मात केली आहे. या आदर्शवत पर्यायी उपक्रमाबद्दल ग्रामपंचायतीचे कौतुक होत आहे. महापुरात पाण्याखाली जाणाऱ्या गावात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीत गावचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवून जिल्ह्यात, राज्यात एक आदर्श निर्माण केला आहे.

दरम्यान ग्रामपंचायतीची गावाला पाणीपुरवठा करण्यासाठीची धडपड पाहून ग्रामस्थांनी 70 हजार रुपये लोकवर्गणी गोळा करून दिली. या लोकवर्गणीतून फिल्टर हाऊसच्या ठिकाणी आणखीन नवीन दोन कुपनलिका खुदाई केली. त्‍याव्दारे चार कुपनलिकेतून पाण्याचा उपसा सुरू केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने आगळावेगळा उपक्रम राबवून दुष्काळजन्य परिस्थितीत गावच्या पाणीबाणीच्या प्रश्नाला पूर्णविराम दिला आहे.

हेरवाड गावची पाणी योजना दूधगंगा नदीवर आहे. दूधगंगा नदी कोरडी पडल्याने नळ पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. सर्वत्रच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हेरवाड येथील काळम्मावाडी वसाहत या उपनगरात तिरंगा चौक आणि शिवराज चौकात ग्रामस्थांना दररोजच्या वापरासाठी दोन छोटे जलकेंद्र आहेत. या जलकेंद्राला कुपनलिकेने पाणी-पुरवठा केला जातो. दूधगंगा नदीचा पाणीपुरवठा बंद झाल्याने या जल केंद्रातील कुपनलिकेचे पाणी फिल्टर हाऊस मधील सब-वेल येथे उपसा करून घेऊन अडीच लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीत लिफ्ट करून शनिवार पासून पाणी पुरवठा सुरळीत केला आहे. ग्रामपंचायतीची ही धडपड पाहून ग्रामस्थांनी 70 हजार रुपये लोकवर्गणी देऊन आणखीन 2 कूपनलिका रविवारी सकाळी साडेसहा इंच व्यासाच्या आणि अडीचशे फूट खोल खुदाई करून पाणी उपसा सुरू करण्यात आला आहे.

शनिवारी 2 कुपनलिकेतून पाणी उपसा केल्यानंतर 7 तास टाकी भरायला वेळ लागला होता. आणखीन नव्या दोन अशा एकूण 4 कुपनलिकाद्वारे पाणी उपसा करायला सुरुवात केल्यानंतर साडेचार तासात टाकी भरल्याने गावचा पाणीपुरवठा नियमित आणि सुरळीत झाला आहे. पाणी-बाणीला हेरवाड ग्रामपंचयतीने आगळावेगळा उपक्रम राबवत दुष्काळजन्य परिस्थितीतही गावचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवून जिल्ह्यात राज्यात एक आदर्श निर्माण केला आहे.

दूधगंगा नदी कोरडी पडल्याने गावच्या नळ पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न निर्माण झाला होता. दोन दिवस टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. यासाठी पर्याय म्हणून कूपनलिकेच्या पाण्याचा उपसा करून पाण्याची टाकी भरून पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या. यानंतर ग्रामस्थांनीही यामध्ये सहभाग नोंदवून लोक वर्गणी दिली आणि आणखीन दोन कूप नलिका खुदाई केल्‍या. या चार कूपनलिकेचे पाणी उपसा करून दुष्काळजन्य परिस्थितीत नागरिकांच्या पाण्याची अडचण सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींसह गावातील सर्वच नेते मंडळी आणि ग्रामस्थांनी सहकार्य केले आहे.
सरपंच रेखा अर्जुन जाधव 

हेही वाचा : 

Back to top button