Dr. Abhay and Rani Bang : डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग यांना शाहू पुरस्कार जाहीर | पुढारी

Dr. Abhay and Rani Bang : डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग यांना शाहू पुरस्कार जाहीर

कोल्हापूर: पुढारी वृत्तसेवा : प्रतिष्ठेचा शाहू पुरस्कार यंदा ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग  (Dr. Abhay and Rani Bang) यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार शाहू जयंतीदिनी (दि. 26 जून) देण्यात येणार आहे, अशी माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तथा राजश्री शाहू मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष राहुल रेखावर यांनी आज (दि.१४) पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. अभय बंग (Dr. Abhay and Rani Bang) यांनी नागपूर मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस. ची पदवी प्राप्त केली. यात त्यांना तीन विषयात सुवर्णपदके मिळाली. त्यानंतर भारतातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (पी. जी. आय.) या संस्थेत त्यांनी काम केले. डॉ. अभय बंग यांनी सर्च या संस्थेच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील अदिवासी भागात वैद्यकीय सेवा आणि संशोधन कार्य केले आहे. बालमृत्यू नियंत्रणावरील त्यांच्या संशोधनाची दखल भारतासोबतच अनेक देशांनी घेतली आहे. पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश व अनेक आफ्रिकन देश त्यांनी तयार केलेले बालमृत्यू नियंत्रणाचे मॉडेल स्वीकारले आहे. वैद्यकीय नियतकालिक द लॅन्सेटमध्ये त्यांचे अनेक लेख छापून आलेले आहेत. त्यांचे स्वतःच्या हृदयरोगावरील अनुभवकथनाचे माझा साक्षात्कारी हृदयरोग हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

डॉ. राणी बंग यांनी एम.बी.बी.एस. झाल्यानंतर डॉ. अभय बंग यांच्याशी विवाह केला. त्यानंतर त्यांनी पतीसोबत समाजकार्यात स्वतःला वाहून घेतले. त्यांनी स्त्रीरोगशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स विद्यापिठातून ‘मास्टर्स इन पब्लिक हेल्थ’ या विषयावरची पदवी त्यांनी १९८४ साली प्राप्त केली. २६ जून रोजी बंग दाम्पत्याच्या सामाजिक कार्याचा गौरव प्रतिष्ठेचा शाहू पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे.

 

Dr. Abhay and Rani Bang : डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांना मिळालेले पुरस्कार  –

  • टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी.लिट. ही सन्माननीय पदवी
  • २००३ सालचा महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार
  • २०१८ सालचा पद्मश्री पुरस्कार

हेही वाचा 

Back to top button