कोल्हापूर-पंढरपूर मार्गावर यंदा तरी रेल्वे धावणार का? | पुढारी

कोल्हापूर-पंढरपूर मार्गावर यंदा तरी रेल्वे धावणार का?

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : आषाढी वारीसाठी कोल्हापूर-पंढरपूर मार्गावर यंदा तरी विशेष रेल्वे धावणार का, असा सवाल भाविकांतून होत आहे. या मार्गावर सध्या कोल्हापूर-कलबुर्गी सुपरफास्ट एक्स्प्रेस दररोज धावत आहे. काही वर्षांपूर्वी रेल्वेेने या मार्गावर यात्रा स्पेशल सोडली होती. यावर्षीही यात्रा काळात आठवडाभर गाडी सोडण्याची मागणी आहे.

पंढरपूरला जाणार्‍या वारकरी, भाविकांची संख्या मोठी असते. यामुळे यावर्षी कोल्हापूर-पंढरपूर मार्गावर विशेष रेल्वे गाडी सुरू करण्याची गरज आहे. पंढरपूरसाठी कोल्हापूर-कलबुर्गी सुपरफास्ट दररोज उपलब्ध आहे. मात्र, दररोज कोल्हापुरातच ही गाडी फुल्ल होते. या गाडीला हातकणंगले आणि जयसिंगपूर हे दोनच थांबे आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. त्यात ही गाडी कोल्हापुरातून दुपारी सुटून पंढरपुरात सायंकाळी सात वाजता पोहोचते. तर पंढरपुरातून सकाळी दहा वाजता सुटते. यामुळे या गाडीने जाऊन दर्शन घेऊन, दुसर्‍या दिवशी याच गाडीने परत येणे थोडे गैरसोयीचे आहे. कोल्हापूर-कलबुुर्गी गाडीला गर्दी वाढत आहे. यामुळे कोल्हापूर-कलबुर्गी या मार्गावर पहाटेही गाडी सोडावी, अशी मागणी होत आहे. ही मागणी मान्य होईपर्यंत किमान या गाडीचे डबे 16 ते 18 पर्यंत वाढवावेत, अशीही मागणी आहे.

आषाढी यात्रेसाठी एस.टी. विभागाकडून जादा गाड्यांचे नियोजन केले जाते. यावर्षी मात्र दरवर्षीच्या तुलनेत यात्रेसाठी जादा गाड्या सोडाव्या लागणार आहेत.

Back to top button