कोल्हापूर : चर्चा महापुराची; सावट मात्र दुष्काळाचे! | पुढारी

कोल्हापूर : चर्चा महापुराची; सावट मात्र दुष्काळाचे!

कोल्हापूर; विशेष प्रतिनिधी :  पावसाळा सुरू होण्यापूर्वीच गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत संभाव्य महापुराच्या चर्चा सुरू झाल्या होत्या; पण वेगवेगळ्या कारणांनी मान्सूनचे आगमन लांबणीवर पडत असल्याने या दोन्ही जिल्ह्यांवर आता दुष्काळाचे सावट पसरायला सुरुवात झाल्याचे दिसत आहे. जलसंपदा विभागाने तर आगामी काळात नदीकाठांवर उपसाबंदी लागू करण्याचे संकेतच दिले आहेत.

मागील दोन महिन्यांपासून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील नदीकाठच्या गावांमध्ये महापुराबद्दल हाकाटी सुरू आहे. आगामी पावसाळा आणि संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये जनजागृतीचे काम सुरू आहे. शासकीय आणि प्रशासकीय पातळीवरूनही महापुराबाबत वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. मात्र, मागील आठवड्यापासून या सगळ्या चर्चांचा नूर एकदम बदलून महापुराऐवजी दुष्काळाच्या सावटाबाबत चर्चा सुरू झाली आहे.

मान्सूनच्या आगमनाबाबत गेल्या महिनाभरापासून वेगवेगळे तर्क-वितर्क वर्तविण्यात येत आहेत. कोणाच्या मते, मान्सून वेळेवर दाखल होईल, तर आणखी कुणाच्या मते, मान्सूनचे आगमन काहीसे वेळाने होणार आहे. तशातच मान्सून आला आला, इथंपर्यंत आला, तिथंपर्यंत आला, आज आपल्याकडे येणार, उद्या तिथंपर्यंत पोहोचणार, अशाही हाकाट्या सुरू आहेत. पण अजून तरी दोन्ही जिल्ह्यांत मान्सूनचे नामोनिशाण दिसायला तयार नाही. तशातच आता दोन्ही जिल्ह्यांतील काही गावांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तिन्ही बाजूंनी पंचगंगा नदीने वेढलेल्या कोल्हापूर शहराला पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. इचलकरंजी आणि जयसिंगपूरसह अन्य काही गावांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सांगली आणि मिरज शहरांत अजून पाणीटंचाई जाणवत नसली, तरी आगामी काही दिवसांत त्यांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

शिवाय, सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात आतापासूनच टँकरची मागणी जोर धरताना दिसत आहे. राधानगरी, काळम्मावाडी, कोयना आणि चांदोली या प्रमुख धरणांमध्ये अत्यंत मर्यादित असा पाणीसाठा आहे. परिणामी, या धरणांमधून अत्यंत कमी प्रमाणात विसर्ग सुरू आहे. पावसाने आणखी काही दिवस ओढ दिल्यास या भागात उपसाबंदी लागू करण्याचे संकेत सांगली जलसंपदा विभागाने दिले आहेत. त्यामुळे एकूणच परिस्थिती विचारात घेता महापुराची चर्चा थांबून आता दुष्काळाच्या सावटाविषयी चर्चा झडताना दिसू लागल्या आहेत.

बळीराजा कासावीस; खरीप हंगामाबाबत चिंता!

यंदा दोन्हीही जिल्ह्यांच्या बहुतांश भागांत मान्सूनपूर्व पावसाने म्हणावी त्या प्रमाणात हजेरी लावलेली नाही. त्यामुळे अद्यापपर्यंत अनेक शिवारांतील हंगामपूर्व मशागतीची कामे पूर्ण झालेली नाहीत. आता मान्सूनने हजेरी लावल्यावरच या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, काही शेतकर्‍यांची शिवारे पेरणीपूर्व मशागतींची कामे पूर्ण करून पेरणीच्या तयारीत आहेत; पण अजून पावसाचाच पत्ता नाही. आणखी आठ-पंधरा दिवस पाऊस लांबला, तर संपूर्ण खरीप हंगामच लांबण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसे झाल्यास खरीप हंगाम साधण्याबाबत शेतकर्‍यांत साशंकता निर्माण होताना दिसत आहे. एकूणच खरीप हंगामाच्या धास्तीने दोन्ही जिल्ह्यांतील बळीराजा कासावीस झाल्याचे चित्र दिसू लागले आहे.

Back to top button