Kolhapur violence : कोल्हापुरात दंगल; अश्रुधूर, लाठीमार | पुढारी

Kolhapur violence : कोल्हापुरात दंगल; अश्रुधूर, लाठीमार

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : औरंगजेबाचे स्टेटस (aurangzeb whatsapp status) ठेवून त्याचे उदात्तीकरण केल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागले. शहराच्या अनेक भागांत दगडफेक, तोडफोडीने दंगल उसळली. त्यात दोनशेवर वाहने, दुकाने, टपर्‍या, घरांचे नुकसान झाले. पोलिसांनी जमावाला नियंत्रणाखाली आणण्यासाठी वारंवार लाठीमार केला. जमाव नियंत्रणात येत नसल्याने पोलिसांना अश्रुधुराची 30 पेक्षा अधिक नळकांडी फोडावी लागली. सुमारे तीन तासांनी दंगल नियंत्रणात आली. दगडफेक, तोडफोडप्रकरणी 50 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे; तर दगडफेक, तोडफोडीत पोलिसांसह 60 जण जखमी झाले. दंगल लक्षात घेऊन प्रशासनाने गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत इंटरनेट सेवा खंडित केली आहे. दरम्यान, दंगलीत सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. (Kolhapur violence)

शिवाजी चौकातील ठिय्या आंदोलनावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांत वारंवार वादावादी झाली. ठिय्या आंदोलनातसहभागी होण्यासाठी ग्रामीण भागातूनही युवक आले होते. शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. दुपारनंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. (Kolhapur violence)

कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती शिवाजी चौक, शिवाजी रोड, लुगडी ओळ, महाराणा प्रताप चौक, लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, महाद्वार रोड, ताराबाई रोड, गंगावेस, पापाची तिकटी, भाऊसिंगजी रोड हे परिसर दगडफेक, तोडफोड आणि लाठीमारामुळे तब्बल तीन तासांहून अधिक काळ कमालीच्या तणावाखाली होते. भाऊसिंगजी रोडवर तर दोन जमाव आमने-सामने आल्याने काही काळ स्फोटक परिस्थिती निर्माण झाली. दंगलग्रस्त परिसरात केवळ आणि केवळ दगड, वीट, बांबू, बाटल्या, काचा यांचाच खच पडला होता. दुचाकी, रिक्षांसह चारचाकी वाहनांची तोडफोड झाली. टपर्‍या, हातगाड्या उलटवून टाकण्यात आल्या. दुकानांसह अनेक घरांवरही दगडफेक करण्यात आली (Kolhapur violence)

औरंगजेबाचे स्टेटस (Aurangzeb Status) ठेवल्याने मंगळवारी कोल्हापुरात तणाव निर्माण झाला होता. हिंदुत्ववादी संघटना याविरोधात आक्रमक झाल्या होत्या. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोर कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. यावेळी काही ठिकाणी दगडफेकही झाली. दगडफेक करणार्‍या सातजणांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. स्टेटस लावणार्‍यांवर कठोर कारवाई करा आणि ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडून द्या, या मागणीवर आक्रमक झालेल्या हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी कोल्हापूर बंदची हाक दिली होती. (Kolhapur violence)

बुधवारी सकाळी आठ वाजल्यापासूनच हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, तरुण गटा-गटाने रस्त्यांवरील दुकाने बंद करतच शिवाजी चौकात येत होते. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत संपूर्ण चौक कार्यकर्त्यांच्या गर्दीने खचाखच भरून गेला होता. हातात भगवे ध्वज, स्कार्फ, भगव्या टोप्या आदीमुळे सारा परिसर भगवा झाला होता. जमाव वाढत असल्याने पोलिसांनी शिवाजी चौकाच्या दोन्ही बाजूने कडे केले. रस्त्यावरच ठिय्या मांडत कार्यकर्त्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय श्रीराम’ आदीसह जोरदार घोषणाबाजी सुरू केली. मंगळवारी ताब्यात घेतलेल्या सातजणांना सोडून द्या, अशा मागणीने पुन्हा जोर धरला. बंदचे आवाहन करत रस्त्यावरून फेरी काढण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला. मात्र, पोलिसांनी त्याला मज्जाव केला; पण कार्यकर्ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यातून पोलिस आणि कार्यकर्त्यांत वादावादी सुरू झाली. कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या विरोधातही घोषणाबाजी सुरू केली. (Kolhapur violence)

शिवाजी चौकात तणाव वाढत गेला

ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडल्याखेरीज शिवाजी चौकातून हलणार नाही, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला. यामुळे तणाव वाढू लागला. बजरंग दलाचे बंडा साळुंखे, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले, शिवसेना शिंदे गटाचे ऋतुराज क्षीरसागर, भाजपचे अशोक देसाई, शिवसेनेचे किशोर घाटगे, उदय भोसले आदींनी अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके, पोलिस निरीक्षक महेश सावंत यांच्याशी चर्चा करत ताब्यात घेतलेल्यांना सोडून देण्याची मागणी केली; पण त्याबाबत निर्णय होत नव्हता आणि जमाव अधिकच संतप्त होत होता. यामुळे शिवाजी चौकात तणाव वाढत चालला होता.

पोलिस अधीक्षक, संघटनांच्या नेत्यांमध्ये चर्चा

सकाळी पावणेअकराच्या सुमारास पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित माळकर तिकटी येथे आले. त्यांनी संघटनेच्या नेत्यांची भेट घेतली. पोलिस व्हॅनमध्ये जाऊन त्यांनी चर्चा केली. त्यात समाधानकारक तोडगा निघाला नाही. यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले. पोलिसांचे कडे तोडून जवामाने माळकर तिकटीकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोनवेळा हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. सकाळी अकराच्या सुमारास मात्र जमाव लुगडी ओळ येथे गेला. काही जणांनी या मार्गावरील दुकाने, घरांवर दगडफेक सुरू केली. पोलिस अधीक्षकांसह अधिकारी आणि पोलिसांनी अवघ्या पाच-दहा मिनिटांत कार्यकर्त्यांची समजूत काढत पुन्हा माळकर तिकटीपर्यंत आणले.

…अन् जमाव हिंसक झाला

याच दरम्यान शिवाजी चौकातील काही कार्यकर्ते गंजी गल्लीत शिरले. त्यांनी दुकाने, घरांवर दगडफेक सुरू केली. ही माहिती समजताच पोलिसांनी अकरा वाजून 20 मिनिटांच्या सुमारास माळकर तिकटी परिसरातील जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार सुरू केला. यामुळे प्रचंड पळापळ झाली. सैरभर झालेले कार्यकर्ते जागा दिसेल त्या दिशेने पळत सुटले. पोलिसही दिसेल त्याच्यावर लाठीमार करत होते. या पळापळीत अनेक दुचाकी पडल्या. त्यात अडकून अनेक कार्यकर्तेही पडले. काही जण तर पडलेल्यांच्या अंगावर पडले. यात कित्येक जण जखमी झाले. सुमारे दहा मिनिटे हा प्रकार सुरू होता. यानंतर जमाव पांगला खरा; पण त्यानंतर दंगलीला सुरुवात झाली.

पोलिसांसह दुकाने, वाहनांवर दगडफेक

माळकर तिकटीवर लाठीमार होताच जमाव चारही दिशेला पळाला. मात्र, काही अंतरावर गेलेला जमाव पुन्हा आक्रमक होऊन परतला. महापालिकेच्या दिशेने येणार्‍या जमावाने पोलिसांवर तसेच त्यांच्या वाहनांवर दगडफेक केली. पान लाईनच्या दिशेने थांबलेल्या जमावाने जवळच असलेल्या एका प्रार्थनास्थळावर दगडफेक सुरू केली. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे ही धुमश्चक्री सुरू होती. पोलिसांनी पुन्हा लाठीमार सुरू केला. त्यातील एक जमाव महाराणा प्रताप चौकाच्या दिशेने गेला. हा जमाव रस्त्यावरील ठराविक दुकाने, टपर्‍या, घरांना लक्ष्य करत पुढे जात होता.

राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्यांसह जादा कुमक मागवली

हा जमाव लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या दारातून बिंदू चौकाच्या दिशेने निघाला. जाताना शाहू टॉकिज परिसर, मटण मार्केट चौक, बिंदू चौकात जमावाने दगडफेक केली. या ठिकाणीही पोलिसांनी लाठीमार करत जमावाला पांगवले. जमाव शिवाजी रोडने दगडफेक करत पुन्हा शिवाजी चौकात आला. जमाव नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्यांसह जादा कुमक मागवली. जमावाला पांगवण्यासाठी पुन्हा लाठीमार करण्यात आला. यामुळे जमाव पुन्हा विखुरला. एक गट भेंडे गल्लीतून महाद्वार रोडवर, एक गट पापाची तिकटीकडे, तर एक गट भाऊसिंगजी रोडवरून सीपीआरच्या दिशेने निघाला. यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. पुढे जमाव आणि पाठीमागून पोलिस असे चित्र या सर्वच परिसरात होते. चप्पल लाईनवरील एका दुकानाला लक्ष्य करत जमावाने त्याची प्रचंड तोडफोड केली. त्यामुळे सर्वत्र काचांचा खच पडला होता.

महाद्वार रोड, ताराबाई रोडवरही तोडफोड

तोडफोड सुरू असल्याने पोलिसांनी पुन्हा लाठीमार सुरू केला. यामुळे जमाव आणखी संतप्त झाला. पापाची तिकटी येथून जमावाचा एक गट महाद्वार रोडवर, एक गट गंगावेसकडे, तर एक गट लोणार गल्लीकडे गेला. या मार्गावरही विशिष्ट दुकानांची तोडफोड सुरू केली. यामुळे कुठे कुठे जायचे, अशी काही काळ पोलिसांची अवस्था झाली. दगडफेक आणि लाठीमारामुळे परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले. महाद्वार रोडवरही कमालीचा तणाव निर्माण झाला होता. त्याचे लोण ताराबाई रोडवर पसरले. या ठिकाणी आलेल्या जमावाने सरस्वती टॉकिजपर्यंत अनेक दुकानांची प्रचंड तोडफोड केली. दुकानातील साहित्य बाहेर काढून फेकून दिले.

दगडफेक, तोडफोडीने दीड कोटीचे नुकसान

कोल्हापूर बंद काळात प्रक्षुब्ध जमावाने विविध ठिकाणी केलेल्या दगडफेक, तोडफोडीत सुमारे सव्वा ते दीड कोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. रात्री उशिरापर्यंत लक्ष्मीपुरी पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यांद्वारे 14 रिक्षा, 8 दुचाकी, 25 दुकानांच्या फलकांची तोडफोड, 2 चिकन गाड्यांची तोडफोड, तर चहाची एक टपरी उद्ध्वस्त करण्याची नोंद झाली आहे. जुना राजवाडा, शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात झालेल्या नुकसानीची माहिती रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाली नव्हती. पंचनाम्याअखेर नुकसानीची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे, असेही सांगण्यात आले.

जमाव अनियंत्रित; नेत्यांचे ऐकना

एकीकडे पापाची तिकटी, गंगावेस, महाद्वार रोड, ताराबाई रोडवर दगडफेक, तोडफोड, पोलिसांवर दगडफेक, असे सुरू असताना जमावाचा एक गट पुन्हा बिंदू चौक, आझाद चौक परिसरात गेला. या ठिकाणीही काही घरे, दुकाने, वाहनांवर जमावाने हल्ला चढवला. या ठिकाणीही पोलिसांनी लाठीमार केला. दरम्यान, पापाची तिकटी, महापालिका परिसरातील जमाव कमी होत नव्हता. याउलट त्यात आणखी भरच पडत होती. पोलिस समोर आले की, कार्यकर्ते वेगवेगळ्या गल्ली-बोळांत शिरत होते. पुन्हा काही वेळात एकत्र येत होते.

भाऊसिंगजी रोडवर धुमश्चक्री

भाऊसिंगजी रोडवरून जमावाचा एक गट सीपीआरच्या दिशेने निघाला. याचवेळी विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी पोलिस अधिकारी आणि पोलिसांच्या ताफ्यासह महापालिका चौकात आले. कार्यकर्त्यांची पळापळ सुरू होताच फुलारी स्वतः हातात काठी घेऊन कार्यकर्त्यांच्या मागे धावत सुटले. त्यामुळे पोलिस अधिकार्‍यांनीही लाठीमार सुरू केला. हा फौजफाटा सिटी सर्व्हे ऑफिसकडून बुरुड गल्लीकडे जमावामागे गेला.

पोलिस बुरुड गल्लीकडे जाताच काही क्षणात भाऊसिंगजी रोडवर दोन गट आमने-सामने आले. या परिसरात रहिवासी असलेले तरुण हातात काठ्या, दगड, विटा, लोखंडी सळ्या घेऊन बाहेर पडले. दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगड, विटा, रिकाम्या काचेच्या बाटल्या फेकल्या जात होत्या. त्यामुळे परिस्थिती कमालीची तणावपूर्ण बनली. हा प्रकार सुरू असताना रस्त्यावर असलेल्या जमावाने पार्किंग केलेल्या चारचाकी, रिक्षा, दुचाकींसह खाद्यपदार्थांचे स्टॉल आदीवर हल्ला चढविला. वाहनांची नासधूस करीत दोन रिक्षा रस्त्यावरच उलटवून टाकल्या.

परिस्थिती नियंत्रणाखाली आली

माळकर तिकटी, पापाची तिकटी, गंगावेस, महाराणा प्रताप चौक या परिसरातही अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे तरुण पुन्हा सैरभैर झाले. लाठीमार चुकविण्यासाठी दिसेल त्या घरात घुसू लागले. दरम्यान, विविध दिशेला जमाव विखुरला गेल्याने पोलिसांनी दिसेल त्याला ताब्यात घेण्यास सुरुवात केली. यामुळे दुपारी दोनच्या सुमारे तीन तासांनंतर परिस्थिती नियंत्रणाखाली आली.

जमावाला पांगविण्यासाठी लक्ष्मीपुरीचे पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांचे प्रयत्न सुरू असतानाच त्यांना अचानक प्रकृतीचा त्रास जाणवू लागला. छातीत वेदना सुरू झाल्या. याच दरम्यान जमावातून आलेला एक दगडही त्यांच्या छातीवर लागला. त्यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. वाहतूक शाखेच्या एका महिला कॉन्स्टेबलसह संजयसिंह दळवी (रा. देवकर पाणंद), ऋषीकेश दळवी (रा. जुना बुधवार पेठ), शब्बीर हुसेन सय्यद (रा. सोमवार पेठ) यांच्यासह सुमारे 60 जण दगडफेक आणि लाठीहल्ल्यात जखमी झाले. या सर्वांना तत्काळ उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. कटकधोंड यांची प्रकृती स्थिर असल्याचे रात्री सांगण्यात आले.

अधिक वाचा :

Back to top button