कोल्हापूर: पन्हाळगडावर शाही थाटात शिवराज्याभिषेक सोहळा | पुढारी

कोल्हापूर: पन्हाळगडावर शाही थाटात शिवराज्याभिषेक सोहळा

पन्हाळा; पुढारी वृत्तसेवा :  हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास ३५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त आज (दि.६) किल्ले पन्हाळगडावर राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात विविध गड किल्ल्यावरून आणलेल्या पाण्याचा जलाभिषेक ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार व शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या हस्ते करण्यात आला.

जलाभिषेकासाठी दक्षिण राज्यातील जिंजी, तंजावर, बेंगलोर फोर्ट, साजरा गोजरा किल्ला, वेल्लूर सर्जा कोट, राजकोट तसेच महाराष्ट्रातील राजगड, सिंधुदुर्ग या किल्ल्यावरून पाणी आणण्यात आले होते. त्याचे विधिवत पूजन संजय पवार यांच्या हस्ते करण्यात आले. शिवमूर्तीला जलाभिषेक व दुग्धाभिषेक मंत्रोच्चारामध्ये घालण्यात आला. त्यानंतर पन्हाळगडावरील मंदिरातील देवी-देवतांना अभिषेक करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा मंदिरामध्ये आरती सोहळा पार पडला. त्यानंतर लेझीम हलगीच्या तालावर तुतारीच्या निनादामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मंदिरापासून श्रीक्षेत्र अंबाबाई मंदिरापर्यंत शिवाजी महाराज यांचा पालखी सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी  शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

पारंपरिक मर्दानी खेळ, हलगी- तुतारीचा निनाद आणि नगरखान्यावरून दणाणलेला नागऱ्याचा दणदणाट व मराठमोळा पारंपरिक लेझीम खेळ गडाने अनुभवला. मावळ्यांचे वेश परिधान करून लहान मुलांनी पालखीसमोर मर्दानी खेळ खेळत नागरिकांना मंत्रमुग्ध केले. १९७४ साली पन्हाळगडावर ३०० वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या शाही थाटात साजरा करण्यात आला होता. हत्तीच्या अंबारीमधून छत्रपती शहाजीराजे, बाल शिवाजी, तानाजी मालुसरे यांच्या वेषातील भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी  ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले की, किल्ले पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव अद्वितीय असे मंदिर आहे. प्रत्येक वर्षी यापुढे शिवराज्याभिषेक सोहळा रायगडप्रमाणेच पन्हाळगडावरदेखील साजरा होत राहील. तसेच किल्ले पन्हाळा गडावर आज ३५० वा राज्याभिषेक सोहळा ठाकरे गटाच्या वतीने साजरा करण्यात आला. हा सोहळा लोकोत्सव म्हणून यापुढे साजरा केला जाईल, असेही पवार म्हणाले.

यावेळी सुनील मोदी, हर्षल सुर्वे, अवधूत साळुंखे, प्रतिज्ञा उत्तरे, गोविंद वाघमारे, सुरेश पवार , बाजीराव पाटील, दत्ताजी टिपूकडे, प्रीती क्षीरसागर, विवेक काटकर, रघुनाथ टिपुगडे, दिपाली शिंदे व शुभांगी साळुंखे आदी उपस्थित होते.

                        हेही वाचलंत का ? 

Back to top button