कोल्‍हापूर : बांबवडे येथे बिबट्याची दुचाकीस्वारावर झडप; दाम्पत्यासह मुलगी बचावली | पुढारी

कोल्‍हापूर : बांबवडे येथे बिबट्याची दुचाकीस्वारावर झडप; दाम्पत्यासह मुलगी बचावली

बांबवडे : पुढारी वृत्तसेवा पिशवी-खोतवाडी (ता. शाहूवाडी) येथे सार्वजनिक जलकुंभ परिसरातील माळरानात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक दुचाकीवर झडप घातली. मात्र, बिबट्याची झडप हुकल्यामुळे सदर दुचाकीवरून प्रवास करणारे खोतवाडी येथील तरुण दाम्पत्य व त्यांची लहान मुलगी सुदैवाने बचवली ही घटना आज (शनिवार) सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.

दरम्यान, सुदैवी दाम्पत्याच्या पाठोपाठ आलेल्या आणखी एका दुचाकीचा याच बिबट्याने पाठलाग केल्याचे समजताच खोतवाडीतील काही ग्रामस्थांनी जलकुंभ परिसराकडे धाव घेतली. यावेळी अस्वस्थ बिबट्या पिशवी गावाकडील शेतातील बांधाच्या आड निघून गेल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. या बिबट्याने केलेल्या सलग हल्ला व पाठलागाच्या घटनेमुळे दक्षिण शाहूवाडी तसेच पश्चिम पन्हाळा भागाकडे रात्रीअपरात्री होणारा प्रवास धोकादायक बनला आहे. साहजिकच पिशवी-खोतवाडी परिसरात प्रचंड भीतीची छाया पसरली आहे. त्यामुळे बिबट्याचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, या दोन्ही घटनांबाबत वनविभागाला कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच या परिसरात गवे, बिबटे या जंगली श्वापदांची नैसर्गिक भ्रमंती असल्याचे सांगत बिबट्याने काही भटकी कुत्री फस्त केल्याच्या घटनांचाही दुजोरा दिला. सद्या नर आणि मादी बिबट्या यांच्यातील मिलनकाळाचा अंतिम टप्पा सुरू असून, याकाळात बिबट्या चंचल आणि अधिक संवेदनशील बनलेला असतो. परिसरात बिबट्याचे चित्कारही ऐकू येत असतात. याबाबत परिसरातील वाड्या वस्त्यांवरील नागरिकांना वेळोवेळी सजग करण्यात आल्याचे सांगत सदरच्या घटनेच्या अनुषंगाने वनरक्षक व कर्मचाऱ्यांच्या पथकाला परिसरात गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button