"...त्यांचाच आमदारकीला विचार केला जाईल"; अजित पवारांनी सांगितला राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा निकष | पुढारी

"...त्यांचाच आमदारकीला विचार केला जाईल"; अजित पवारांनी सांगितला राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा निकष

पुढारी ऑनलाईन डेस्क : “विधानसभेच्या आधी लोकसभेच्या निवडणुका आहेत. लोकसभेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने जे उत्तम काम करून दाखवतील आणि निकाल देतील त्यांचाच आमदारकीला विचार केला जाईल,” असे राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट केले.

आज (दि.४) माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी आमदार भरत गोगावले यांनी केलेल्या दाव्यातही तथ्य नसल्याचेही सांगितले. आमदार गोगावले यांनी अजित पवार युतीमध्ये येण्याच्या तयारीत आहेत, असा पुन्हा दावा केला होता. यावर अजित पवार म्हणाले की, “माझं मी सांगायला खंबीर आहे, दुसऱ्यांनी वकिलपत्र घेण्याची गरज नाही, माझी भूमिका स्पष्ट असते, हे महाराष्ट्राला माहित आहे. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून पक्षात आहे आणि यापुढेही राहील. गोगावले असतील किंवा अजून कोणी कोणाच्याही बातमीवर विश्वास ठेवू नये, याच्यात काहीही तथ्य नाही. माझ्यावर प्रेम फार ऊतू चाललं आहे, म्हणून माझं सतत नाव घेतलं जातं,” असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

“मुंबई महापालिका जिंकल्यानंतर शिवसेना पक्ष मोठा झाला. मुंबई शहरात राष्ट्रवादीचे कमी आमदार आणि नगरसेवक निवडून येतात. उद्धव ठाकरेंना विनंती केली आहे की, मुंबई महापालिका निवडणुकीला एकत्र सामोरे जावू. यावर उद्धव ठाकरे यांनी नाही म्हटलं नाही तर एकत्र बसून विचार करू असं सांगितलं आहे,” असेही ते म्हणाले.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेवर बोलताना पवार म्हणाले की, “प्रकाश आंबेडकर यांचे आमच्या पक्षाबद्दल नेहमीच मतं वेगळं आहे. वंचितचे ते नेते आहेत, त्यांनी काय वक्तव्य करावी तो त्यांचा अधिकार आहे. पण त्यांचे आमच्या पक्षाबद्दल वेगळं मत आहे हे जाणवतं.”

“आता आम्ही विधानसभेसाठी कोण कोण इच्छुक आहे, नवीन कोणी इच्छुक आहे का, कार्यकर्त्यांचं काय मतं आहे, महिलांच्यात कोणी पुढे येत आहे का, याचा अंदाज घेतला जात आहे. लोकसभेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. या निवडणूकीच्या निमित्ताने उत्तम काम करतील आणि निकाल देतील त्यांचा आमदारकीला विचार केला जाईल,” असेही अजित पवार यांनी सांगितले.

Back to top button