कोल्हापूर : ‘जन्मोजन्मी लाभो तुझी साथ’; शाहूवाडी तालुक्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी | पुढारी

कोल्हापूर : 'जन्मोजन्मी लाभो तुझी साथ'; शाहूवाडी तालुक्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी

विशाळगड; पुढारी वृत्तसेवा : पती-पत्नीचे नाते सात जन्म टिकावे यासाठी ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमेला शाहूवाडीसह येळाणे, विशाळगड, गजापूर, केंबुर्णेवाडी, दिवाणबाग, बौध्दवाडी, भाततळी परिसरातील सर्वच सु‌वासिनींनी वडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घातले. परिसरात वडाच्या झाडांची पूजा करण्यासाठी आणि त्याला सूत बांधण्यासाठी महिलांनी आज सकाळपासूनच गर्दी केली होती.

आख्यायिकेनुसार, सत्यवान आणि सावित्री या दाम्पत्याच्या आयुष्यात आलेला एक दिवस म्हणून वटपौर्णिमा आधुनिक युगातही तितक्यात पारंपरिक पध्दतीने साजरी केली जात आहे. हिंदू धर्मातील सण, प्रथा, परंपरा या निसर्गाच्या संस्कृतीशी जोडल्या गेल्या आहेत. जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी वटपौर्णिमेला विवाहित महिला वटवृक्षाच्या मुळाशी पाणी शिंपून आणि बुंध्याला सुताचे सात फेरे घालतात. ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. या परंपरेप्रमाणे वटवृक्ष असलेल्या ठिकाणी वटवृक्षाची पूजा करण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.

वडाच्या वृक्षाचे आयुष्य जास्त असते. तसेच त्याच्या पारंब्यांचा विस्तारही खूप मोठा होतो. त्याचप्रमाणे नैसर्गिकतः दीर्घायुष्य लाभलेल्या वडाच्या वृक्षाप्रमाणे आपल्या पतीला आणि कुटुंबीयांना आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभावे, हा त्यामागचा हेतू आहे. शनिवारी (दि. ३) रोजी सकाळपासूनच सुवासिनींमध्ये पूजेची लगबग सुरू झाली होती. साजशृंगार करून हातामध्ये पूजेचे ताट घेऊन परिसरातील महिलांनी वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारून वडाच्या झाडाची मनोभावे पूजा केली. आंबे, केळी, फुले, हळद-कुंकू साहित्याने वडाची पूजा करत सुवासिनींनी जन्मोजन्मी हाच पती लाभो, अशी प्रार्थना केली, यावेळी महिलांनी एकमेकींना हळदी-कुंकू लावून आंब्याचे वाण दिले.

नवविवाहितांसह ज्येष्ठ महिलांचाही उत्साह

एकविसाव्या शतकात वावरत असलो तरी आई, आजी सासू, सासु यांच्या समवेत नव्या पिढीतील सुवासिनींसोबत नववविवाहितांनी देखील वटपौर्णिमेचे व्रत मनोभावे केले. ‘सात जन्म याच सख्याची साथ लाभू दे’ म्हणून वयाने, मानाने मोठ्या असलेल्या सुवासिनींच्या पाया पडत आशीर्वाद उखाणे घेतले. एकंदरच सकाळपासूनच वडाच्या भोवती सुवासिनींनी गर्दी केली होती. दुपारच्या सुमारास तुरळक गर्दी होती. पारंपरिक पद्धतीने सर्वत्र वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. वडाच्या झाडाच्या पूजनासोबत ओठी भरणं, हळदी कुंकू आदींसाठी महिला वर्गाची विशेष लगबग होती. वट पौर्णिमेनिमित्त चैतन्यमय असं वातावरण दिसून आले आहे. चांगला साज शृंगार करत पारंपरिक वेशभूषेत महिला वर्ग पूजेसाठी एकत्रित आल्या होत्या.

वडाच्या फांद्यांचीही पूजा

वटपौर्णिमा या सणाच्या निमित्ताने सर्वाधिक ऑक्सिजन देणाऱ्या वडाच्या भव्य झाडाची सुरक्षा पूर्वापार चालत आली आहे. झाडाची पूजा करा, झाडे तोडू नका असा संदेशही व्रतातून दिला जातो. मात्र, अनेकांनी बाजारातून किंवा झाड असेल त्या ठिकाणाहून वडाच्या फांद्या आणून त्याला तुळशीत रोवून पूजा केली.

हेही वाचा :

Back to top button