

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : मुदाळ (ता. भुदरगड) येथील हुतात्मा स्वामी वारके सहकारी सुतगिरणीच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी २१ जागासाठी ३१ अर्ज दाखल झाले होते. मंगळवारी (दि. २३) माघारीच्या अखेरच्या दिवशी १० उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने या संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यामध्ये कापूस उत्पादक गटातून ११, बिगर कापूस उत्पादक गटातून ५ व इतर राखीव गटातून ५ असे २१ उमेदवार बिनविरोध निवडण्यात आले असून ७ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
राधानगरी, भुदरगड, कागल व करवीर या चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या मुदाळ येथील हुतात्मा स्वामी वारके सूतगिरणीची स्थापना माजी आमदार के. पी. पाटील यांनी केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेचे काम आदर्शवत चालले असून संस्थेने अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. स्थापनेपासून निवडणूका बिनविरोध झाल्या आहेत. यावेळीही निवडणूक बिनविरोध झाली आहे.
बिनविरोध निवडलेले उमेदवार असे, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, पंडितराव केणे, सुरेशराव सूर्यवंशी, तात्यासाहेब जाधव, उमेश भोईटे, धोंडीराम वारके, आर. व्ही. देसाई, दतात्रय देसाई, विकास पाटील,शिवानंद तेली, गणपतराव डाकरे, पंढरीनाथ पाटील, मनोज फराकटे,जगदीश पाटील, दत्तात्रय पाटील, बापूसो आरडे, विठ्ठलराव कांबळे, काका देसाई, रूपालीताई पाटील, अलका नलवडे, विकास पाटील, आदिंनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. संस्थेचे ८३३६ व्यक्ती व ३१३ संस्था सभासद आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राधानगरीचे सहायक निबंधक युसुफ शेख काम पाहत आहेत.