कोल्हापूर: शेडशाळ येथील सदाशिव कदम यांचे ग्रा.पं.सदस्यत्व रद्द | पुढारी

कोल्हापूर: शेडशाळ येथील सदाशिव कदम यांचे ग्रा.पं.सदस्यत्व रद्द

कवठेगुलंद, पुढारी वृत्तसेवा: शेडशाळ (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सदाशिव मरर्गेन्द्र कदम यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे कोल्हापूर जिल्हाधिकारी न्यायालयाने त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व अपात्र ठरविले. येथील तक्रारदार शामराव श्रीपती कांबळे यांनी ग्रामपंचायत सदस्य सदाशिव मर्गेन्द्र कदम यांच्या विरोधात दि. ६ जुलै २०२० रोजी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार केली होती. यामुळे अर्जदार विरोधी प्रतिवादी १ सदाशिव कदम, प्रतिवादी २ ग्रामसेवक शेडशाळ असे वाद कोल्हापूर जिल्हाधिकारी न्यायालयात सुरु होता.

शेडशाळ येथील सिटी सर्व्हे नंबर १०१ च्या दक्षिण बाजूला असणाऱ्या डांबरी रस्त्यावर सदाशिव कदम गोठा बांधत होते. यामुळे अर्जदार यांनी दि. ६ जुलै २०२० रोजी तहसीलदार कार्यालयांना तक्रारी अर्ज दिला होता. त्यानंतर जिल्हा परिषदेने शिरोळ पंचायत समितीला चौकशीचे आदेश दिले होते.

दि. २८ ऑक्टोबर २०२० रोजी पंचायत समितीने प्रतिवादी एक यांना कारवाईचे कळविल्याने सदर अतिक्रमण बांधकाम थांबवले होते. दरम्यान, ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत कदम वॉर्ड क्रमांक २ मधून निवडून आले होते. त्यानंतर पुन्हा सिटी सर्व्हे नंबर १०१ च्या दक्षिण बाजूस शासकीय डांबरी रस्त्यावर १४ फुटाचे बांधकाम केल्याचे दिसून आले. त्यामुळे शेडशाळ येथील सदर तक्रारीचा चेंडू जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात गेला.

सदर पुरावे अहवाल त्यावर सर्व चौकशी तपासणी केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 14 (1)( ज3) अन्वये प्रतिवादी क्रमांक 1 यांच्या कुटुंबाचे शासकीय जमिनीवर अतिक्रमण असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे सदाशिव कदम यांचे ग्रामपंचायय सदस्यत्व अपात्र ठरवत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी न्यायालयाने दिला. अर्जदाराकडून वकील प्रकाश भेंडवडे यांनी काम पाहिले.

हेही वाचा 

Back to top button