कोल्हापूर : 10 राज्यांत धुमाकूळ घालणार्‍या दरोडेखोरांच्या टोळीला अटक | पुढारी

कोल्हापूर : 10 राज्यांत धुमाकूळ घालणार्‍या दरोडेखोरांच्या टोळीला अटक

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह दहा राज्यांत दरोडे घालणार्‍या आणि बंगळूर व मुंबईतील संघटित टोळ्यांशी कनेक्शन असलेल्या कर्नाटकातील टोळीचा म्होरक्या दीप्या डफाळेसह त्याच्या साथीदारांना कोल्हापूर पोलिसांनी शुक्रवारी बेड्या ठोकल्या. टोळीकडून दरोडा, घरफोडी, चोरीसह चेन खेचण्याचे 36 गुन्हे उघडकीला आले आहेत. 31 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 35 लाख 83 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. टोळीचा म्होरक्या नितेश ऊर्फ दीपू जगन्नाथ डफाळे (वय 37, रा. रुक्मिणीनगर, बेळगाव), शुभम सुनील सूर्यवंशी (19, आर.पी.डी. कॉलेज रोड, बेळगाव), उमेश ऊर्फ लिंगराज रामेगौंडा (36, जमनटळ्ळी, ता. सकलेशपूर, जि. हासन), राजू सल्वराज तंगराज (35, कारगल, जि. शिमोगा), भीमगौडा मारुती पाटील (रा. हलकर्णी, ता. गडहिंग्लज) अशी अटक केलेल्यांंची नावे आहेत. टोळीतील आणखी चार साथीदार फरार असून, आणखी किमान 20 ते 25 गंभीर गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.

या टोळीकडून चोरीच्या गुन्ह्यांतील किमान 65 ते 70 तोळ्यांचे दागिने हस्तगत करण्यात येतील, असे सांगून बलकवडे म्हणाले, महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह दहा राज्यांत टोळीने गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. येत्या काही दिवसांत सव्वा ते दीड कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात येईल, असेही ते म्हणाले. तसेच टोळीतील सदस्यांचे मुंबई व बंगळुरातील काही सराईत गुन्हेगार टोळ्यांशी कनेक्शन असल्याचेही पोलिस तपासात उघडकीला आले आहे.

36 गुन्ह्यांचा पर्दाफाश

टोळीतील सराईतांनी पोलिसांकडे 36 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. प्राथमिक चौकशीत कोल्हापूर जिल्ह्यातील 17, सोलापूर जिल्ह्यातील 3, कर्नाटकातील 5 गुन्ह्यांचा समावेश आहे. शाहूपुरी, जुना राजवाडा, राजारामपुरी, गोकुळ शिरगाव, गडहिंग्लज येथील घरफोडी, चोरी व चेन खेचण्याचे गुन्हे उघडकीला येतील, असेही ते म्हणाले.

म्होरक्या, साथीदारांवर गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड

टोळीच्या म्होरक्यांसह सराईतांविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, लूटमार, जबरी चोरी, फसवणूक, बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. म्होरक्या नितेश डफाळे याच्याविरुद्ध (46), उमेश ऊर्फ लिंगराज (22), राजू तंगराज (64), भीमगौंडा पाटील (37), शुभम सूर्यवंशी (19) अशा स्वरूपाच्या गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड असल्याचेही बलकवडे व अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी सांगितले.

दागिने, दुचाकी, मोटार, 24 जिवंत काडतुसे जप्त

टोळीकडून 31 तोळे सोन्याचे दागिने, दुचाकी, 9 एम.एम. पिस्टलची 24 जिवंत काडतुसे, मॅगझिन, चोरीच्या दागिन्यांच्या विक्रीतून खरेदी केलेली आलिशान मोटार, असा 35 लाख 83 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

उमेश रामेगौंडा… तो मी नव्हेच

टोळीतील उमेश रामेगौंडा हा कर्नाटकातील खतरनाक गुन्हेगार म्हणून ओळखला जातो. खून, खुनाच्या प्रयत्नांसह अनेक गंभीर गुन्ह्यांत तो कर्नाटक व अन्य राज्यांतील पोलिसांना चकवा देत फरार होता. कृष्णा अशोक तलवार या बनावट नावाने तो वावरत होता. उमेश रामेगौंडाला नावाबाबत विचारले असता, तो मी नव्हेच, असे सांगून पोलिसांची दिशाभूल करीत होता. कोल्हापूर पोलिसांनी मात्र त्याचे बिंग फोडले.

नितेश ऊर्फ दीपू डफाळेचा प्रवास…

इंजिनिअर ते टोळीचा म्होरक्या

टोळीचा म्होरक्या नितेश ऊर्फ दीपू डफाळे उच्चशिक्षित आहे. सिव्हिल इंजिनिअरचे शिक्षण घेताना तो अमली पदार्थ सेवनाच्या विळख्यात अडकला. त्यानंतर तो अमली पदार्थांची तस्करीही करू लागला. विनासायास मिळणार्‍या पैशांचा त्याला हव्यास जडला. घरफोडी, चोरी, वाटमारी, शस्त्र व अमली पदार्थ तस्करीतून त्याची कमाई होऊ लागली. सीमाभागात स्वतःच्या नावाचा दबदबा निर्माण केला. टोळीच्या माध्यमातून महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह 10 राज्यांत त्याने टोळीचे बस्तान बसविले. दीप्या डफाळे टोळी या टोपण नावाने त्याची दहशत वाढू लागली.

चेन खेचण्याच्या गुन्ह्यात साथीदाराला 10 हजार रुपये

चेन खेचण्याच्या गुन्ह्यात टोळी सराईत आहे. यासाठी पैशांची गरज असलेल्या तरुणांचा वापर करण्यात येत होता. अशा गुन्ह्यांनंतर दुचाकीवर पाठीमागे बसणार्‍या साथीदारांना प्रत्येक गुन्ह्यात 10 हजार रुपये दिले जात होते. कोल्हापूर जिल्ह्यात दोन ते अडीच वर्षांपासून धुमाकूळ घातलेली टोळी प्रथमच कोल्हापूर पोलिसांच्या ‘रडार’वर आली आहे.

तपास पथकाला 35 हजारांचे बक्षीस

शहर व जिल्ह्यात या सराईत चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. टोळीला जेरबंद करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी जंगजंग पछाडले. सहायक निरीक्षक सागर वाघ, उपनिरीक्षक शेष मोरे, विनायक सपाटे यांच्यासह नितीन चोथे, प्रकाश पाटील, विनायक चौगुले, हरीश पाटील, सागर कांडगावे, संजय पडवळ, अनिल पास्ते, संतोष पाटील आदी दोन महिने टोळीच्या पाळतीवर होते. अखेर म्होरक्यासह टोळीला जेरबंद करण्यात यश आले. पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी टीमला 35 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

Back to top button