कुरुंदवाड, पुढारी वृत्तसेवा : सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्याने शर्यतींच्या बैलांना सोन्याची किंमत येणार आहे. शेतकरी, बैलगाडी मालक यांच्यामध्ये एक नवा हुरूप, नवचैतन्य निर्माण झाले आहे. तसेच बारा बलुतेदारांना चांगल्या प्रकारचे काम मिळणार आहे. शर्यतीवरील बंदीमुळे सुतार, लोहार, शिकलगार, नालबंद या लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता.आता शर्यती सुरू झाल्याने त्यांच्या पोटाची सोय झाली आहे .
महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला अनन्या साधारण महत्त्व आहे. न्यायालयाच्या चौकटीत सुरू असलेल्या बैलगाडा शर्यतीचा सर्वोच्च न्यायालयाने 10 ते 12 वर्षांनी दिलेल्या निर्णयाने शेतकर्यांच्या उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.प्राणीमित्रांनी दाखल केलेल्या याचिकेबाबत शेतकर्यांनी आपण बैलांना किती आपुलकीने प्रेमाने जपतो हे शासन दरबारी पटवून दिले आहे. दरम्यान खासदार अमोल कोल्हे, खासदार धैर्यशील माने यांनी वारंवार शासन दरबारी बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला होता.
पश्चिम महाराष्ट्रात दोन प्रकारचे बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जाते. मॅरेथॉन व पट्टा पद्धतीने शर्यतीचे आयोजन केले जाते. सध्या यात्रा, उरुस, जयंती, जत्रा, उत्सव सुरू आहे. यानिमित्ताने अनेक गावात हजारापासून ते लाखापर्यंतच्या बक्षिसांच्या शर्यतीचे आयोजन केले जात आहे. यामुळे आता शर्यत शौकिनांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
बैलगाडा शर्यती बंद झाल्यापासून बैल, वासरू तयार करणे याकडे दुर्लक्ष झाले होते. केवळ शेती कामासाठी बैलांचा वापर होत होता. त्यामुळे बैलांच्या किंमती मध्ये कमालीची घसरण झाली होती. मात्र, सध्या शर्यती सुरू झाल्यापासून तयार खोडांना, बैलांना चांगलीच किंमत येत आहे. शिवाय शेतकरी, बैलगाडी धारक बैल जोड्या तयार करण्यात चांगल्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे पुन्हा बैलांना सोन्याचा भाव मिळत असल्याचे सध्यातरी चित्र आहे.सध्या बैलगाडा शर्यती सुरू झाल्याने यावर अवलंबून असणारे हॉटेल, टपरी, छोटा व्यवसाय करणारे सर्वांनाच काम मिळणार आहे. शासनाने बैलगाडा शर्यतींना पुन्हा पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय दिल्याने बैलांच्या संख्यामध्ये वाढ होईल. शिवाय बैलांचे संगोपन चांगल्या प्रकारे होऊन चांगल्या जातीवंत बैलजोडी पाहायला मिळणार हे मात्र निश्चित.
शासनाने मोठे मन करून बैलगाडी शर्यतीला परवाना दिला आहे. आता शर्यत घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ही हिरवा कंदील दाखवला आहे.सध्या बैलांना मिळणारी किंमत गगनाला भिडण्याची जोगी आहे. पूर्वी या शर्यतीमध्ये शेतकरी सहभागी होत होता. मात्र सध्या तरुण वर्ग, अनेक मंडळ यात सहभागी होत असल्याने सध्या बैलांना चांगली मागणी होत आहे. पूर्वी गावात 8-10 बैलजोडी असायची सध्या 2-3 दिसत आहेत. तसेच शर्यती पूर्ववत झाल्यास भविष्यात आपणाला चांगल्या जातिवंत जनावरे पाहायला मिळेल.
– सत्येंद्रराजे नाईक-निंबाळकर, यड्राव
-हेही वाचा