सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर बैलगाडा शौकिनांसाठी अमोल कोल्हेंकडून खास गिफ्ट; केली 'ही' मोठी घोषणा | पुढारी

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर बैलगाडा शौकिनांसाठी अमोल कोल्हेंकडून खास गिफ्ट; केली 'ही' मोठी घोषणा

पुणे, पुढारी ऑनलाईन: बैलगाडा शर्यतीवरील बंदी सुप्रीम कोर्टाने उठवली आहे. बैलगाडा शर्यतींच्या परवानगीबाबत गुरुवारी सुप्रीम कोर्टाने अंतिम निकाल दिला आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतीचे शौकिनांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार आमोल कोल्हे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. बैलगाडा शर्यतीवर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं कोल्हे यांनी जाहीर केलं आहे.

खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, “बैलगाडा शर्यतीवर चित्रपट काढण्याची तयारी सुरु झाली आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बैलगाडा मालकाचे कष्ट, त्यांचं बैलांसोबत असलेलं नातं हे सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.” यासंदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय दबावतंत्र वापरलं जातं आहे. संसदेत हा विषय मांडताना मी अनुभवत आहे. या आंतरराष्ट्रीय दबावतंत्राचा बुरखा फाडणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

पुढे बोलताना कोल्हे म्हणाले की, “काही गोष्टी आपल्या अस्तित्वासाठी आणि स्वाभिमानासाठी मांडाव्या लागतात. स्वराज्यरक्षक संभाजी मालिका 157 देशांमध्ये पोहोचली. संभाजी महाराजांचा खरा इतिहास घराघरात पोहोचला. यानंतर शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या निमित्ताने राज्यातील प्रत्येक शहरात मोठ्या संख्येने प्रेक्षक इतिहास अनुभवत आहे. तसेच बैलगाडा शर्यत महाराष्ट्राच्या मातीचा श्वास आहे. ती सुद्धा याच पद्धतीने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली पाहिजे. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी परदेशातील लोक येतील आणि या शर्यतीचा एक मोठा सोहळा होईल, अशा पद्धतीने हा चित्रपट तयार केला जाणार आहे.”

“राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे. ही नक्कीच आनंदाची बाब आहे. सर्व बैलगाडा शर्यतप्रेमींसाठी हा दिवाळी आणि दसऱ्यासारखा दिवस आहे. बैलगाडा शर्यतीला परवानगी देताना सर्वोच्च न्यायालयाने काही अटी घालून दिल्या आहेत. आनंदाची बाब असली तरीदेखील ही एक मोठी जाबाबदारीही आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व नियमांचं पालन करुन यापुढील बैलगाडा शर्यती दिमाखदार पद्धतीने पार पडतील,” असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

Back to top button